५ - बर्फवृष्टी
न्युझीलंड मधल्या साऊथ आयलंडची सफर महत्वाची. विमानाची तिकीटं, एसयुव्ही कारचे बुकींग, बी एन् बी मध्ये रहाण्याची व्यवस्था ह्या सगळ्याचं रिझर्व्हेशन करून ठेवलं होतं. सकाळी लवकरच निघालो.ऑकलंड विमानतळावर गाडी पार्क केली. क्राईस्ट चर्च च्या विमानाची बोर्डींग कार्ड्स घेऊन विमानात बसलो. दिड तासांत क्राईस्टचर्चला पोहोचलो. विमानतळाच्या बाहेरच आधीच ठरवलेल्या मोटार बुकींग वाल्या कंपनीची व्हॅन उभी होती. सामान त्यात भरले आणि काही अंतरावर असलेल्या कंपनीच्या मोटार बुकींग च्या ऑफिसच्या शेड मध्ये आलो. एक सत्तरीच्या आजीबाईंनी आमचं स्वागत केलं. जरूरी कागदपत्र तयार केली आणि एका एसयुव्ही मोटारींची चावी आमच्या सुपुर्द केली. बॅगा त्या गाडीत ठेवायला एका दणकट आजोबांनी मदत केली. मुलाने स्टेअरींगचा ताबा घेतला. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. गाडीच्या खिडक्या बंद करताना बाहेर लक्ष गेलं. गोरे आजी आणि आजोबा हात हलवून आम्हाला म्हणत होते “हॅपी जर्नी, एंजॉय युवर ट्रीप!”
मुसळधार पाऊस, थंडी. त्यात सकाळी लवकर निघाल्या मुळे पोटात कावळे ओरडत होते. मॅपवर पहात मुलाने मोटार एका मॅकडोनाल्ड च्या आवारात पार्क केली. पोटपुजा आणि कडक कॉफि घेऊन तरतरी आली. पुढचा मोटार प्रवास आठ तासांचा. दक्षिण बेटावरचं पर्यटनाचं गाव. मुक्काम पोस्ट वनाका.

पावसाची संतत धार. सभोवती हिरव्या कुरणांची पसरलेली शेतं. कित्येक एकर पसरलेल्या कुरणांत चरत असलेल्या मेंढ्यांचे कळप. त्यात अनोळखी द्रृष्य म्हणजे प्रत्येक कुरणात एका कोपऱ्यात उभी असलेली पाणी सिंचनाची मशीन. शेताच्या एका टोका पासून दुसऱ्या टोका पर्यंत लांबी चा हात. त्यावर जागो जागी सिंचनाचे तूषार उडवणारी छिद्र. सिंचनाचा वेगळाच प्रकार पाहून मजा आली. दक्षिण भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ही सिंचनाची व्यवस्था. आजचा पाऊस पाहून मात्र ह्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे हे सांगून खरे वाटले नसते. आज मात्र पाऊस थांबायला तयार नव्हता. पावसामुळे वेगावर नियंत्रण ठेवत मोटार पुढे जात होती. थंडी, पाऊस, धुकं एकत्र अनुभवत पुढे जात होतो. हिरवळीची छटा बदलताना दिसायची ती बांधावरची झाडे पाहून. दोन कुरणांच्या मध्ये दोन पुरुष उंच झाडे. व्यवस्थीत कातरलेली, लांबुन पहाणाऱ्याला ती हिरवी भिंत दिसत होती. न्युझीलंड मध्ये नैसर्गिक संपत्तीचा वापर कल्पकतेने केलेला दिसला.
पनवेल खोपोली पर्यंतचा सपाट भाग संपवुन खंडाळा घाट सुरू होतो. तसाच तासाभराचा प्रवास संपुन डोगर दिसू लागले. एक डोंगर रांग ओलांडून पुढे पुन्हा सपाट रस्ता लागला. लांब दिसणारे हिरवे डोंगर,जंगलातला रस्ता वळणं घेऊ लागला. समोरून येणाऱ्या वाहनांचे बंपर पांढरे दिसू लागले. थोड्याच वेळात आमच्या मोटारीवर पावसाच्या मोठमोठाल्या थेंबांचा आवाज येऊ लागला. दुधासारखे थेंब समोरच्या काचेवर रेंगाळू लागले. वायपरचा वापर करूनही थेंबाचा पांढरट रंग काचेवर पसरत होता. पुढे रस्ता पांढरा झाला होता. आजूबाजूचे डोंगर दाढी वाल्या सांताक्लपॉज सारखे दिसत होते. वेगळाच अनुभव. वेगळाच निसर्ग आणि ती बर्फाची बरसात!
पुढे पुढे रस्त्याच्या बाजूची शेतं, डोंगर उतार, घरांची कौलं सगळं बर्फाने भरून गेलं होतं. गाडी जपून चालवावी लागत होती. आजूबाजूचा बर्फ दिसत होता. रस्त्यावर वाहनांच्या चाकांच्या खुणांनी बर्फाचे तिनं पट्टे झाले होते. मधल्याच दोन काळ्या पट्यांवरून मोटार जात होती. ह्या काळ्या पाट्यांवरचा बर्फ दिसत नव्हता. तोच भाग जास्त निसरडा होता. वेग कमी करून गाडी चालवणे महत्वाचे होते.
अशा रस्त्यावरचा प्रवास म्हणजे भिती आणि साहस हातात हात घालून चालत असल्याचा अनुभव. बराच वेळ हेच दृष्य दिसत होते. टुमदार घरांचं गाव लागलं आणि आम्हाला बर्फात भिजायचा मोह टाळता आला नाही.मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून मनसोक्त बर्फ अंगावर झेलत फोटो काढले. रस्त्याच्या दुतर्फा ब्लॉसमची सुंदर झाडं. रंगीत फुलांची. भुरभुरणारा पांढऱ्याशुभ्र बर्फाचा चुरा. अंगात गरम कपडे होते.तरीही आम्हा मुंबई करांसाठी ही थंडी जास्तच होती. रस्त्याच्या एका टोकावर जिल्ह्याचे नाव होते “मॅकॅंझी” आणि गाव होतं “फेअर ली”.

दुपारच्या बाराची वेळ होती. डोगर रांगां मधला रस्ता, बर्फ सतत बरसत होता. काळोख व्हायच्या आधी मुक्कामावर पोहोचायचे होते. मोटारीचा वेग वाढवण्याची इच्छा असुनही मनाचा ब्रेक लावावा लागत होता.वळणांच्या रस्त्यात एके ठिकाणी बरीचशी वाहनं उभी असलेली दिसली. बर्फाळलेला वाहनं तळ. तिथेच एका रांगेत मोटार उभी केली. आजू बाजूला बरेच पर्यटक गुढग्या एवढ्या बर्फाच्या चिखलात उतरून सभोवती च्या निसर्ग दर्शनाचा आनंद घेत होते. बहुतेक ते एक हिल स्टेशन असावे. बर्फाच्या थंडीत सगळ्यांनी रस्त्याच्या जवळच असलेल्या टॅयलेटला भेट दिली. एका बाजूला खानपानाचे स्टॉल दिसत होते, आम्ही गरम गरम कॉफी चे कप घेऊन निघालो.
अजुनही बर्फ आमची पाठ सोडत नव्हता. पुढे मोठा घाट असल्याचे मॅप वर दिसत होते. वेग वाढवणे सुरक्षीततेच्या दृष्टीने बरोबर नव्हते. काश्मिरात लेह लडाख मध्ये डोंगराळ भागात बर्फ वृष्टी होते आणि पर्यटक अडकुन पडतात अशा बातम्या टिव्हीवर पहातो. आठवण झाली आणि मनाला समजावले “शुभ बोल नाऱ्या”. लवकरात लवकर घाट पार करण्याचा प्रयत्न. वळणांच्या रस्त्यावर, उंच डोंगर उतारांच्या भितींवर बर्फाचे प्लास्टर दिसत होते. काही ठिकाणी बर्फाच्या जाड थरा मधुन सुकलेले गवत, छोटी झाडे बाहेर डोकावत होती. घाटाच्या सर्वात उंच टप्प्यावर आलो आणि घटकाभर थांबलो. सगळीकडे बर्फ, बर्फ आणि बर्फ. आकाशही आपला निळा रंग सोडून बर्फाच्या पांढऱ्या रंगात मिसळून गेले होते. अशा रक्त गोठवणाऱ्या थंडीत आपले जवान देशाच्या रक्षणासाठी हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात कसे रहात असतील?

चला, निसर्गाचा अक्राळ विक्राळ अवतार पहाण्याची वेळ येण्या आधी आम्ही निघालो. एका बोर्डवर घाटाचे नाव लिहीले होते “लिंडीज पास.” लिंडीज घाटाच्या उतारांवर गाडीचा वेग थोडा वाढला होता.मुक्कामाला वेळेत पोहोचण्या साठी!

वनाका गाव आलं तेंव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. आखीव रेखीव रस्ते. चौकांची मोठाली रिंगणं. मोटारी आपसुक शिस्तीत चालत होत्या. छोट्या दुकानांनी आपले दरवाजे खाली ओढले होते. आम्ही दुपारचे जेवण विसरलो होतो. तिथल्याच एका चौकात पिझ्याच्या दुकानात गर्दी दिसली. मोटार कडेला लावून मुलगा पिझ्याचा पुडा घेऊन आला. पुढच्याच वळणावर बी एन बी चे १५ नंबरचा कॉटेज होते. समोरच्या रस्त्यावर १५नंबरच्या पार्कींग ची जागाही होती. घराच्या गेटवर एक पेटी होती. फोनवर आलेला पासकोड टाकला आणि ती छोटी पेटी उघडली. त्यात चावी होती घराची. रिसेप्शन नाही, मॅनेजर नाही इलेक्ट्रॉनिक आणि कॉंप्युटर, फोनच्या मदतीने सगळं चाललं होतं.
चावीने दरवाजा उघडला आणि आत शिरलो. समोरच बैठकीची खोली. मागचे सरकणारे दार उघडून छोटीशी हिरवळ होती. दरवाजा उघडताच गारठा जाणवला. दरवाजा बंद करून मागे फिरलो तर काचेचा चौकोनी बॉक्स, त्यांच्या वरच्या बाजूला एक पाईप. हा होता हिटर, इलेक्ट्रीक वर चालणारा. बटन दाबताच काचेच्या चौकोनात लाकडं पेटल्या सारखं वाटू लागलं आणि घर उबदार झालं. हिंदी जुन्या सिनेमातल्या शिमल्याच्या बंगल्यात आल्या सारखं वाटलं. टिव्ही, टीपॉय वर सुंदर मॅगझिन, त्यांच्या जोडीला चित्रांच्या पझलने भरलेले बॉक्स. किचन प्लॅटफॉर्म पाहून ही म्हणाली देखील “आपल्याकडे असाच पाहिजे होता”. दुसऱ्या बाजूला जिन्या खाली वॉशिंग मशिन.
जिन्याने पहिल्या माळ्यावर दोन बेडरूम. जाड पडद्या मागच्या उंच खिडक्यांमधून बाहेर पाहताच अगदी अंगणातच असल्यासारखी दिसणारी बर्फाच्छादीत शिखरं. दिवस भराच्या प्रवासानी अंग मोडून गेलं होतं. कपडे धुळीने माखले नव्हते, पण बर्फ अंगावर घेऊन गारठलेल्या अंगावर कधी एकदा गरम पाणी घेतो असे झाले होते. फ्रेश होऊन सगळे उबदार दिवाणखान्यात जमलो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भुक दिसत होती. परत थंडीत जेवायला बाहेर जायला लागू नये म्हणून मुलाने पिझ्याची सोय केली होती. पिझ्याचा बॉक्स उघडून त्यावर ताव मारला. हिला किचन पाहून राहवले नाही. सगळ्यांच्या हातात गरम गरम चहाचा मग दिला. दिवसभराच्या प्रवासातील आठवणी रंगल्या. त्या नंतर झोपेच्या आधीन केंव्हा झालो ते कळलेच नाही. सकाळी लवकर उठायचे होते. उद्याचे ठिकाण होते “मिलफर्ड साउंड”!
विलास देशमुख बोरीवली मुंबई