चकोर पक्षी चांदण्यांची वाट पहातो. असाच वाट पहाण्याचा काळ आम्ही अनुभवला. वर्षभर वाट पाहून न्युझीलंड चा विसा मिळवला होता. पुढे सगळी जमवाजमव करण्यात वेळ लागला. तिथला उन्हाळा ऑक्टोबरच्या शेवटी सुरू होतो. त्या प्रमाणे सुट्टी प्लान केली होती. तिथला निसर्ग पहाता पहाता रोज नव नवीन स्थळांची माहिती मिळत होती.त्यातलच एक “वायटोमो”.

सकाळीच निघालो. हाय वे सोडून गाडी टुमदार घरांच्या गावात शिरली. रस्त्यात एका उपहारगृहा समोर थांबलो.पार्किंग साठी भरपुर जागा. आत जाऊन पहातो‌ तर बेकरीचे पदार्थ दिसत होते. पावाचे वेगवेगळे प्रकार, चीज, लोणी, जामची रेलचेल होती. क्रोसेंट नावाचा पाव आपल्या भल्या मोठ्या समोशा सारखा, एक खाल्ला की पोट भरते. स्कोन्स नावाचा पावाचा प्रकार घेतला. चीज मध्ये पिठ मिसळून बनवलेला हा पाव सद्रृष्य पदार्थ चाखायला मिळाला. त्यावर मोठा कप भरून कॉफी. कॉफीचा कप हातात घेऊन आम्ही मोटारीत बसलो. कॉफीचा आस्वाद घेत घेत पुढे निघालो.

साधारण बाराच्या सुमारास आम्ही वायटोमोला, ग्लो-वर्म्स च्या सेंटर‌वर पोहोचलो. आधीच कॉंप्युटर वर आमचं तिकीट बुक केलं होतं. ते १ वाजताचं होतं. खिडकीतल्या तिकीट वाल्या बाईंनी माहिती पुरवली. म्हणाली “यू कॅन विजीट नीअर बाय एनशंट केंव्ह्स”.

तिकीटवाल्या बाईने शेजारच्या गुंफा पहाण्याचा सल्ला तिथल्या तिकीटांसह दिला. पुढच्याच वळणावर जाऊन गाडी थांबवली. एका शेड मध्ये आम्ही उभे होतो. इतक्यात आणखी काही पर्यटक येथे आले. त्यांच्या पाठोपाठ एक तरूण कारमधुन उतरला आणि रांगेपुढे येऊन तिकीटे पाहू लागला. सगळ्यांना त्याच्या मागे येण्यास सांगून पुढे चालू लागला. एक छोटीशी टेकडी चढून तो एका दरवाजासमोर उभा राहीला. सगळे आलेले पाहून त्याने दरवाजा उघडला आणि आम्ही आत प्रवेश केला.

Image

पांढऱ्याशुभ्र चुनखडीने बनलेली नैसर्गिक कलाकुसर. वर छता पासून पाया पर्यंत खाली येणारे सुळके दिसत होते. छतातुन ढिबकणाऱ्या पाण्यामुळे चुनखडीचे ते आकार तयार झाले होते. काही पायथ्या पासुन वर छताला टेकू पहाणारे आकारही होते. ही सगळी कलाकृती म्हणजे निसर्गाचा चमत्कार होता. एक सेंटी मीटर नक्षी तयार व्हायला कित्येक वर्षे लोटली होती. अशा कलाकुसरीच्या धक्का न लावता पुढे जायचे होते. कित्येक हजार वर्षे झिरपणाऱ्या पाण्यामुळे हे निरनिराळे आकार तयार झाले होते. अशा संगमरवरी दिसणाऱ्या पण प्रत्यक्षात चुनखडी असलेल्या निरनिराळ्या आकृत्या तयार झाल्या होत्या.अशी अनेक दालनं पहात आम्ही त्या गाईडच्या मागे फिरत होतो. काही ठिकाणी बॅटरीचा उजेड दाखवुन गाईडने किवी पक्षाचा आकार कसा तयार झाला आहे हे दाखवले. तीथेच एका बाजूला सुंदर स्त्री असावी असे शिल्प तयार झालेलं होतं. एका कोपऱ्यात माकडाची आकृती दिसत होती. भली मोठी गुंफा. त्यात ती स्त्री, ते वानर. रामायणातली कथा आठवली!

Image

पहिल्या माळ्यावर फिरताना गाईडने गुहेच्या भिंतींवर छता खाली ठळकपणे दिसणाऱ्या खुणा दाखवल्या. एक खुण कुठल्याशा वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे गुंफेत पाणी भरल्याची होती.दुसरी पाण्याच्या लेव्हल ची खुण आणखी कुठल्याशा वर्षातल्या महापुराची होती.मला एकदम बातमी आठवली थायलंड मध्ये फुटबॉलची अख्खी टीम एका गुहेत अचानक भरलेल्या पाण्यात अडकली होती. महिनाभराच्या प्रयत्नाने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. ठाण्याच्या वृंदावन सोसायटीतले रहीवासी आपल्या घरातल्या भिंतीवरच्या खुणा पुर्वी पाहुण्यांना अशाच अभिमानाने दाखवायचे. त्या लेव्हल चे मार्क्स पहाताना माझी नजर एकदम एक्झिट च्या लाल दिव्यांकडे गेली आणि पावले भराभर त्या दिशेने पडू लागली. न्युझीलंडचा निसर्गाची किमया काय सांगावी? कुठल्या वेळी काय होईल हे आपण पामरांनी कसे सांगावे?

तासाभराने बाहेर आलो आणि ग्लो वर्म्स च्या गुहेत शिरलो. सुरूवातीलाच फोटोग्राफरने आमचे फोटो काढले. काळोख्या गुहेत शिरण्यापुर्वी एका धिप्पाड माओरी तरूणाने सर्व पर्यटकांच्या घोळक्याचा ताबा घेतला. उंच गोबऱ्या गालाचा गाईड, माओरी उच्चारांच्या इंग्रजीत बोलत होता. बराच वेळ काळोखातून त्याच्या मागे मागे चालल्यावर एकेठिकाणी सगळे थांबले. दोन मजले उतरून आम्ही खाली आलो होतो. ऑंखे सिनेमातल्या विलनचा गुप्त अड्डा अशाच गुहेत होता. तेथेच आमच्या गाईडने माहिती सांगायला सुरूवात केली. गुहेच्या त्या भागामध्ये मंद दिव्यांचा प्रकाश खेळवला‌ होता. एका उंच दगडावर उभं राहून माओरी गाईड बरंच काही सांगत होता. पर्यटकांचे चेहरे अस्पष्ट दिसत होते. ते भारावलेल्या नजरेने गाईडकडे पहात होते. बोलता बोलता तो म्हणाला “कॅन एनी वन कम फॉर्वड‌ ॲन्ड सींग अ सॉंग”? काळोखातल्या मंद प्रकाशात हा माणूस आपल्याला काळोखात कुठे घेऊन जात आहे? आणि ह्या अशा‌ ठिकाणी गाणं का बोलायला सांगतोय? बावरून गेलेले पर्यटक काहीच बोलले नहीत. “ओके, आय सींग फॉर यू” असे म्हणून त्याने माओरी गाण्यांचा सुर लावला. गाण्याला थोडा इंग्रजी गाण्याचा बाज होता. थोडं आपल्या गोव्याच्या तालाने जाणारे ते गाणे होते. कुणालाच त्यातला ओ की ठो कळला नाही. मी मात्र त्याचा अर्थ अभिषेकी बुवांनी गायलेल्या गाण्यांशी लावला. “चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर..”.

पुढे एका निमुळत्या जागेत सगळे पर्यटक आले की नाही याची खात्री करून त्याने बोलायला सुरूवात केली. “आता आपण निसर्गाचा चमत्कार पहाणार आहोत. सगळ्यांनी डावीकडे पहा.” हे बोलून त्याने गुहेतले सगळे दिवे‌ बंद केले. कृत्रीम दिव्यांचा प्रकाश गायब झाला आणि डाव्या बाजूच्या घळी मध्ये असंख्य ग्लोवर्म्स चमकू लागले.अंधाऱ्या आकाशात चांदण्या दिसाव्यात असा तो प्रकार होता. त्या घळीच्या छताला चिकटलेले असंख्य काजवे सद्रृष्य किटक आणि त्यांनी आपले भक्ष पकडण्यासाठी सोडलेला कोळ्याच्या जाळ्या सारखा द्रव पदार्थ त्यांच्या स्वप्रकाशात स्पष्ट दिसत‌ होता. घळीच्या आत डोकावून पाहिले असता ती पाण्याने भरलेली दिसली. दमट ओलसर जागेत हे काजव्यां सारखे किटक पाहून पर्यटकांनी आपापल्या भाषेमध्ये उत्स्फूर्त हुंकार दिले.

Image

पुढे त्याच काळोख्या घळीमध्ये बोटीत बसवून छताला चिकटलेले चांदणे पहाण्याची छोटी फेरी झाली.बोटीची छोटीशीच राऊंड. एक वेगळाच अनुभव! सगळेच पर्यटक चांदणे टिपणाऱ्या चकोरा सारखे वाटत होते. गाईडच्या शिट्टी ने ते टिपणं अर्ध्यावर सोडून बोटीतून बाहेर यावे लागले.

अरण्य ऋषी श्री मारुती चितमपल्ली हे मराठी वन्यजीव अभ्यासक, लेखक आहेत. त्यांनी चकोरा बद्दल आपले निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात जंगलात वाळवीचं वारुळ असतं. ह्या वाळवीचं‌ वैशिष्ट्य हे, की ती काळोखात चमकते. चांदण्याचे कण समजुन चकोर त्यांना खातो. त्या साठी तो रात्र होण्याची‌ वाट पहात असतो. तोच हा चमकणाऱ्या वाळवीचा प्रकार असेल‌ का? एक मनातला प्रश्न.

ज्या पॅसेज मधुन बाहेर आलो, तो पॅसेज सरळ रेस्टॉरंट मधुनच जात होता. चिकनचा खमंग‌ वास नाकात‌ भरला तिथल्याच एका टेबलवर बसून जेवण. मुख्य गेट मधून बाहेर पडायच्या आधी स्टॅण्ड वर अभिप्राय लिहायचे टॅब होते.

डोक्यात गुहेत पाहिलेले कण होते. मराठीतला इंग्रजी स्पेलींग मध्ये अभिप्राय लिहीला.

“जैसे शारदियेचे चंद्रकळेमाजी अमृतकण कोंवळे, ते वेंचिती मने मवाळे, चकोरतलगे । तियापरी श्रोतां, अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता, आणुनियां ।’’

ज्ञानेश्वरी कशी अनुभवावी, हे सांगताना पहिल्या अध्यायात माऊलीनी हे लिहीले आहे.

अभिप्राय लिहीताना तिथल्या माओरी लोकांना मराठी अभिप्राय कळेल की नाही ह्याचा विचार केला नाही.

कळोखातलं माओरी गाणं तरी कुणाला कळलं होतं?

विलास देशमुख बोरीवली, मुंबई