३ - उत्तर रंग
न्युझीलंड देश दोन भागांमध्ये विभागला आहे. उत्तर बेट आणि दक्षिण बेट. दक्षिण बेट दक्षिण धृवाशी हात मिळवण्याचा प्रयत्न करतंय. उत्तर बेट लांब असलेल्या सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया बेटांना टाटा करण्यात गुंतले आहे. मुख्य हवामान थंड. त्याबरोबर असलेले अंगाला झोंबणारे वारे हे त्यापेक्षा ही थंड. नोव्हेंबर नंतर तेथे उन्हाळा सुरू होतो. डिसेंबर मधल्या ख्रिसमसला ह्या भागात आईस्क्रीम खातात असे शाळेतल्या भुगोलात होते.
शनीवारी सकाळीच निघालो. एक प्रेक्षणीय स्थळ पहायला. मुलगा आणि सुन बरोबर होते. ठिकाणाचं नाव “रिएंगा रिएंगा” असं काहीतरी म्हणत होते. संध्याकाळी परत यायचे होते. आम्हाला वाटलं लोणावळ्या साखरं हिल स्टेशन असेल. मुंबईहुन जवळ. संध्याकाळ पर्यंत घरी!
रस्त्यात मध्ये मध्ये गावं लागत होती. टेकड्यांवर रस्ता वळणं घेत होता. छोटे मोठे घाट पार करताना वेग कमी करावा लागत नव्हता. वहानांची रहदारी असुन शिस्तबद्ध वेग मर्यादा पाळली जात होती. सृष्टी सौदर्य पहाता पहाता आपण किती किलोमिटर आलो ते पहाण्याचे भान नव्हते. थोड्या वेळाने हिरवी शाल पांघरलेला डोंगर रस्त्याच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला समुद्र. त्यात पडलेले प्रतिबिंब पाहून कवी बोरकरांची कविता आठवली, “समुद्र बिलोरी ऐना…!”
मोटारीत टेंपरेचर कंट्रोल होतं. म्हणजे थंडी कंट्रोल केली होती. समुद्र उजवीकडे ठेवून गाडी डावीकडच्या गल्लीत वळली. गल्लीच्या दोन्ही बाजूला खाद्याची दुकानं. त्यातलं एक हेरलं. कॉफीचे कागदी कप घेऊन आम्ही पुन्हा समुद्रावर गेलो. कॉफिचे घोट घेता घेता फेरफटका. समुद्रावरचा स्वच्छ वारा, गारठा, कॉफी मुळे आलेली तरतरी. ती प्रसिद्ध कॉफी आणि ते गाव “पाहिया”.
हिरव्या टेकड्या, त्यावरील लुसलुशीत गवतावर अखंड ताव मारणारे मेंढ्यांचे कळप. रस्ता संपेपर्यंत हेच दृष्य. नाही म्हणायला काही कुरणांच्या टेकड्यांवर गायी दिसल्या. रंग काळा आणि पांढरा. जणू शाळेतली युनीफॉर्म मधली मुलंच मैदानात हुंदडत आहेत! तारेच्या कुंपणाच्या कोपऱ्यात उभा असलेला घोडा. त्याच्याअंगावर खोगीरासारखी ओढलेली गोधडी. पांढऱ्या शुभ्र मेंढ्या आणि काळ्या पांढऱ्या गायींची कवायत घेणाऱ्या मास्तरांसारखा त्यांच्यावर लक्ष ठेवून उभा होता. हेच दृष्य प्रत्येक हिरव्या टेकड्यांवर ठरलेलं. जीथे हिरवी कुरणं नव्हती तिथे हिरव्या जंगलांनी डोंगर झाकुन टाकले होते. सगळा प्रदेश हिरवा हिरवा आणि गाऽर!
दुपारचा एक वाजला होता. एका टेकडीच्या माथ्यावर आमची गाडी थांबली. चार पाच कार्स, एक दोन कॅंपींगच्या व्हॅन्स. त्यांच्या रांगेत मुलाने गाडी पार्क केली. पाऊस पडत होता. ढग त्या टेकडीवर पसरले होते. ढग कसले सगळीकडे धुकेच धुके पसरले होते. त्यात पाऊस,दुपारची वेळ असुन आकाशात सुर्य दिसत नव्हता. त्यावर कुरघोडी करणारी थंडी. सगळं वातावरण रामसेंच्या चित्रपटाला साजेसं.
छत्री घेऊन आम्ही निघालो. धुक्यातुन वाट काढीत फलकांवरच्या सुचना आणि दिशादर्शक बाण हेच आमचे वाटाडे होते. टेकडीच्या कडेकडेने जाणारी वाट,त्यावरील मातीचा रस्ता फक्त दिसत होता. काही पर्यटक परतताना दिसत होते. अशा धुरकट वातावरणात उत्तर टोकाकडे आम्ही चाललो होतो. मनात धास्ती होती. एवढ्या लांबचा प्रवास करून केप-रिएंगाला आल्यावर नुसता पाऊस, थंडी आणि धुक्यात हरवलेली वाट पहावी लागणार? वाऱ्यावर थरथरणारी छत्री सावरत आम्ही पुढे पुढे चाललो होतो. आम्हाला जास्त वाट पहावी लागली नाही. अर्ध्या वाटेवर असताना सुन व मुलगा ओरडून म्हणाले “बाबा ते बघा!” पहातो तर काय? पांढऱ्या रंगाचं अस्पष्ट दिसणारं देवळाच्या कळसासारखं काहीतरी दिसू लागलं. समुद्रात किंवा किनाऱ्यावर असलेल्या दिपगृहांबद्दल ऐकलं होतं. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या भर समुद्रात बरेच आत दिसणारं संक रॉक दिप गृह आठवलं. “धुक्यात चालत चालत आपण समुद्राच्या जवळ आलो की काय?” स्वतःचीच समजुत काढीत म्हणालो. “टेकड्यांच्या जवळ कुठला आलाय समुद्र? आपण तर कितीतरी टेकड्यांची वळणं पार करून एवढ्या उंचीवर आलो आहोत” मी माझा तर्क बोलुन दाखवला.
आपला खंडाळा लोणावळ्याचा निसर्ग बरा म्हणायची वेळ आली. विक एंडला वेळात वेळ काढून आलेल्या पर्यटकांची त्याला काळजी असते. एखाद्या पॉइंट वरून दरीत पहाणाऱ्यांना तो जास्त वेळ तिष्ठत ठेवत नाही. झरकन धुक्याची चादर बाजूला करून दरीतलं सौंदर्य दाखवतोच, तसेच पांढऱ्या शुभ्र धबधब्यांच्या धारा पाहून मुंबई पुण्याकडची माणसं तृप्त होऊन जातात. पटापट हा खेळ दाखवुन पर्यटकांना संध्याकाळपर्यंत घरी पोहोचण्यास मोकळं करतो. न्युझीलंडच्या निसर्गाला पर्यटकांची काळजी नाही की काय? अर्धा तास झाला तरी धुके कमी होत नव्हते.
मुलांना बरोबर चालण्यास सांगीतले. सावधपणे आम्ही पुढे जात होतो. आता आम्ही दिपगृहाच्या अगदी जवळ आलो होतो. धुक्याने झाकलेले दिपगृह पहात होतो. इतक्यात अचानक सुर्य दर्शन झाले आसमंत उन्हाने नाहुन निघाला. पांढऱ्या शुभ्र रंगातले उंच दिपगृह आमच्या समोर होते. आकाशात गेलेला दिपगृहाचा कळस पहाण्यात आम्ही दंग होतो. त्यावर दिवा कुठे लावतात आणि तो किती मोठा असावा हे पहाण्यात रमलो होतो. इतक्यात पाठी मागुन ओऽऽह असा जोरात कल्ला ऐकू आला. पहातो तर काय आम्ही एका उंच शिखरावर उभे होतो खाली खोल पायथ्याशी समुद्र पसरला होता. रायगडावरली टकमकटोका वरून पाहिलं आणि जिथं छत्री निजामपूर गाव दिसतं तेथे समुद्र. असे ते दृष्य होते!

हेच न्युझीलंड चं उत्तर टोक. बरेच लांब पर्यंतची धुक्याची चादर बाजूला गेली आणि पुन्हा एकदा पर्यटकांचा कल्ला. आम्ही जरा कठड्या जवळ जाऊन पाहू लागलो. आमच्या तोंडून पण ओह,मस्त! असे शब्द निघाले. त्याचं कारण म्हणजे ते दृष्य. समोर समुद्रांचा संगम स्पष्ट दिसत होता. आपण नद्यांचा संगम पाहिलेला असतो. येथे तर दोन समुद्र एकमेकांना भेटत होते. एक होता टास्मानचा समुद्र आणि दुसरा म्हणजे पॅसिफिक महासागर. संगमाजवळ दिसणारी सिमा रेषा पाण्याच्या रंगांवरून स्पष्ट झाली होती. लाटांवर स्वार होऊन ही रेषा कधी पॅसिफिक महासागरा कडे झुकत होती तर कधी टास्मान समुद्राकडे. एका बाजूला निळेशार पाणी तर एका बाजूला पाणीदार पाणी. टास्मान समूद्र कुठला आणि पॅसिफिक महासागर कुठला ह्यावर आमची चर्चा रंगली असताना धुक्याचा पडदा पडला आणि आम्ही पुन्हा दिपगृहाकडे वळलो. एका बाजूला खांबावर जगातल्या सगळ्या महत्वाच्या शहरांच्या नावाचे दिशादर्शक बाण लावले होते. लंडन, न्युयॉर्क, टोकियो, दिल्ली. बहुतेक सगळी शहरं उत्तरेकडे दर्शवली होती. दक्षिणेकडे होती न्यूझीलंडची शहरं आणि दक्षिण धृवावरचं अंटार्क्टिका!
जवळच एका फलकावर माहिती वाचायला मिळाली. केप रिएंगा हे ह्या स्थळांचं नाव. शाळेत असताना केप ऑफ गुड होप ह्या ठिकाणाचं नाव नकाशात शोधून काढताना आफ्रिका खंडाच्या समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या टोकावर पहावे लागे. तसेच हे केप रिएंगा. न्युझीलंड चे समुद्रात शिरलेले उत्तर टोक. न्युझीलंडच्या मुलनिवासी माओरी माणसां मध्ये प्रचलीत असलेली प्रथा इथे समजली. ह्या शिखरांवर पोहुटुकावा नावाचे प्राचीन वृक्ष आहेत. त्या वृक्षांच्या मुळांना लोबकळून मृत माओरी माणसांचे आत्मे एकदा मागे वळून पहातात आणि सद्गती पावण्या साठी लांब उडी मारतात. मुळांचा आधार घेऊन शिखरावरून लोंबकळत मारलेली उडी खाली समुद्र मार्गे स्वर्गात घेऊन जात असावी. असो, हे सगळं वर्णन वाचल्यावर वातावरणाची थोडी भिती वाटली. आत्म्यांना सद्गती मिळावी म्हणून आपल्याकडे नदी संगमावर उत्तर क्रिया करतात. इथे तर देशाच्या उत्तर टोकावर असलेल्या समुद्र संगमावर आत्म्यांना सद्गती मिळते.
हरखून जाणे म्हणजे काय याचा अनुभव आला. तो उंच शिखरावरून पाहिलेला समुद्र संगम,सहाशे किलोमीटर चा लॉंग ड्राईव्ह, ती थंडी, तो मंद उजेड आणि मनात साठवून ठेवलेला निसर्ग!
तिथल्या आत्म्यांना सद्गती मिळो अशी प्रार्थना केली आणि परतीच्या प्रवासाला लागलो. निसर्ग नवल पहाता पहाता आत्म्यांचा विसर पडला, पण आमची आवस्था कृष्णाला पहिल्यांदाच पहाणाऱ्या स्वयंवर नाटकातल्या रुक्मिणी सारखी झाली होती.
भाव दुजा नुरला जीव कसा वश झाला. मम आत्मा गमला !
विलास देशमुख
मुंबई
६/१२/२०२४