माओरी न्युझीलंड चे मुल निवासी. नंतर डच आणि इंग्रजांनी प्रवेश केला. त्यात नेहमीप्रमाणे इंग्रजांनी बाजी मारली. दक्षिण भागात मिळणारा हिरवा पत्थर माओरींसाठी सोन्या पेक्षा मौल्यवान.इंग्रजांनी मात्र तिथलं सोनं शोधलं. पहाडात, डोंगरात, असलेलं सोनं मिळवताना माओरींशी संघर्ष झाला असेलच. माओरींबरोबर जमवुन घेत इंग्रजांनी विकास केला. त्यांच्यात झालेला तह प्रसिध्द आहे. जमीन, जंगल, जल यांची मालकी माओरींकडेच राहील. या उपर माओरींशी भागीदारी करून इंग्रजांनी विकास करावा.

ह्या तहाचा फायदा दोन्हीकडच्या लोकांनी करून घेतला. त्यातूनच आजचा समृध्द न्युझीलंड दिसत आहे. हा तह जेथे झाला ते “वायटांगी” मैदान. हा तह “वायटांगी तह” म्हणून प्रसिद्ध आहे. आजुबाजूच्या हिरवळीवर मनसोक्त फोटो. दोनशे वर्ष जुने वृक्ष पहाण्यात वेळ कसा गेला कळलेच नाही. हिरवळ, चेरी ब्लॉसमचा टवटवीतपणा, थंडी, सुर्यास्ताची मंद किरणं आणि आसमंतात पसरू लागलेला संधी प्रकाश अंगावर घेत आम्ही गाडीत येऊन बसलो.

“अशा थंडीत वडा पाव आणि चहा मिळाला तर काय बहार येईल?” मी गाडीत बसता बसता म्हटलं. “मी बर्गर खाणार आहे” हीने ठामपणे सांगीतले. मला मुंबई ची आठवण आली होती. ती गर्दी‌, ती धावपळ. येथे सगळं वेगात पण व्यवस्थीत, शिस्तीत. सगळं सुटसुटीत. मोकळे रस्ते, दोन वाहनांमध्ये भलतेच अंतर. ओव्हरटेक करण्याची घाई नाही. ओव्हर टेक करायचा असेल तर मागुन येणारा गाडीवाला, मुक संदेश देत असे. हा संदेश पुढच्या गाडीवाला समजुन घेत असे. मागाच्याला रस्ता मोकळा करून दिला जाई. हॉर्न नाही. मी मुलाला म्हटलं “तुला कसं समजलं, त्याला ओव्हरटेक करायचा आहे ते?” अरे बाबा, त्याने त्याची गाडी अगदी जवळ आणली, म्हणजे समजायचे की त्याला घाई आहे, ओव्हरटेक करायचा आहे.” “हॉर्न वजवण्याची प्रथा‌ येथे नाही.”

Image

१०० किमी प्रती तासांच्या वेगाने गाडी पळत होती. रस्त्याच्या एका बाजूला डोंगर उतार, त्यावर पसरलेली हीरवी कुरणं. दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र. त्यावर पार्क केलेल्या असंख्य पांढऱ्या याटच्या होड्या. मी त्या रस्त्याला कोस्टल रोडच म्हटलं. मोकळा रस्ता सोडून अमची गाडी. मनुष्य वस्तीच्या जवळ आली. वाहतूक कोंडी जाणवू लागली. पहातो तर काय ती गर्दी सिग्नल ची होती. येथेही दोन गाड्यांमध्ये अंतर राखलेले. दोन‌ सिग्नल्स पार करून आमची गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. बैठ्या टुमदार घरांची रांग. मुलगा गाडीतून उतरला आणि शेवटच्या घराजवळच्या केबीन मध्ये गेला. थोड्याच वेळात हातात टेक-अवेच्या दोन कागदी पिशव्या घेऊन आला.

टेक-अवे म्हणजे आपल्याकडचं पार्सल. गाडीत बसुन त्याने पार्सलं आमच्या हातात दिली. म्हणाला, “एकात बर्गर आणि दुसऱ्यात वडा पाव आहे”. मुलांनी आणि मी वडापाव खाल्ला. हीने बर्गर बरोबर वडापाव टेस्ट केला. बर्गर आणि वडापावच्या भांडणात वड्याच्या चवीने तह घडवून आणला होता. “अगदी मुंबई सारखा आहे” ह्या वाक्याने त्यातली कलमं मान्य झाली. हीने आणखी एक वडापाव मागवला. येताना मुलाने कागदी ग्लास आणले - चहाचे. न्युझीलंड च्या गायीच्या घट्ट दुधाचा चहा. “मुबई वडापाव” आणि “चाई” चे ते दुकान होते. गारठ्यात गरम चहाने तहाचा शेवट गोड केला होता. काही वेळा पुर्वी पाहिलेले वायटांगी मैदान. तो होता माओरी आणि इंग्रजांचा तह आणि हा बर्गर आणि वडापाव तह!

हरीयाणवी दाम्पत्याने सुरू केलेला हा व्यवसाय. सामान आणण्या साठी साध्या होंडा गाडी पासुन सुरू केलेला धंदा, हल्ली सामान, रेंजरोवर मधुन येत होतं.

नेहमीचच चित्र! मराठी माणसाने सुरू केलेल्या व्यवसायाची भरभराट एक भारतीय माणूस न्युझीलंड मध्ये करीत होता!

विलास देशमुख

बोरीवली, मुंबई

०३/१२/२४