मुंबईहून रात्री निघालो. पहिला टप्पा पाच तासांचा. सिगापुर पर्यंतचा. एअर बस, ३८० जातीचं विमान. सिंगापुर एअरलाईन्सचं. विमानाची टापटीप पहाण्यासारखी होती. सुरक्षेची सुचना,स्क्रीन वरच दिसत होती. सुचना संपताच विमान उडालं. बंगालच्या उपसागरा वरचा प्रवास. खाण्याची फेरी झाली. एवढ्या मोठ्या विमानात प्रवाशांची सरबराई करताना विमान कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत होती. विशेष करून हवाई ललनांच्या चपळाईने हे सगळं सहज घडत होतं. सिंगापुरच्या पारंपारीक बारीक वेलबुट्टी ची नक्षी असलेल्या गणवेशातल्या,सडपातळ बांधा,बेताचीच उंची आणि बारीक डोळे असलेल्या हवाई सुंदऱ्या “ओऽशुअर, ओके” असं म्हणत प्रवाशांच्या मागण्या पुऱ्या करीत होत्या. त्यांचे इंग्रजी उच्चार समजुन घेईपर्यंत आमचं विमान ९०० किमी च्या वेगाने सिंगापुरच्या दिशेने पुढे जात होतं. “थॅंक्यू” असा उच्चार आपण भारतीय करतो. सिंगापूरी ललना “तॅंक्यू” बोलून पुढे जात होत्या.

सिंगापुरला पोहोचल्यावर तासाभराने पुढचे विमान होते. सिंगापुर-ऑकलंड प्रवास दहा तासांचा. सिंगापुरला आमचे विमान वेळेत पोहोचले. बाजुच्याच गेटवर एअर न्युझीलॅंडचे ऑकलंडला जाणारे विमान होते. विमानाच्या दारातच हवाई सुंदरीनं आम्हाला वेलकम केलं आणि बोर्डींग कार्ड पाहुन आमची सीट कुठल्या रांगेत आहे ते दाखवलं. लांबच्या प्रवासात मधल्या मार्गिकेजवळची सीट मिळाली तर बरें वाटते. मध्येच उठून मार्गिकेत फेऱ्या मारता येतात. खिडकीमधुन दिवसाच्या प्रकाशात बाहेर फक्त ढग दिसतात आणि थोड्या वेळाने आपले डोळे समोरच्या स्क्रीनवर सिनेमा शोधू लागतात. वरच्या खणात हॅंडबॅग ठेवण्याची प्रवाशांची धडपड सुरू होती. कमी उंचीची एक मुलगी बॅग वर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होती. उंचीमुळे तीला ते जमत नव्हतं. ह्या सुबक ठेंगणीला कुणीही मधू मलूश्टे मदतीला आला नाही. मार्गीकेमध्ये प्रवाशांची गर्दी झाली. हे पाहून समोरच उभी असलेली एक धिप्पाड हवाई सुंदरी सरसावली. तिने एका हाताने वरच्या खणाचे दार उघडले आणि दुसऱ्या हाताने बॅग खणात ठेवली. क्षणात मार्गिकेमधली गर्दी सुरळीत पुढे जाऊ लागली. सिंगापुर पर्यंतच्या प्रवासातली नजाकत जाऊन दणकटपणा दिसू लागला. गोरा वर्ण गव्हाळ झाला. बारीक डोळे मोठ्ठे झाले. उंची वाढल्यामुळे प्रवाशांना माना वर करून बोलावं लागलं. उत्तरे कडून दक्षिणेकडे जाताना हा बदल दिसला. गणवेशावरची बारीक वेलबुट्टी जाऊन मोठी पानं, वेली, पिसं दिसू लागली. न्युझीलॅंडने निसर्गाला दिलेलं महत्व!

सकाळी नऊच्या सूमारास सिंगापुरहुन विमान उडालं. तासाभराने ब्रेकफास्ट ची राऊंड झाली. आजूबाजूला वेगवेगळ्या वर्णाचे,देशांचे प्रवासी दिसु लागले. साधारण साडे बारा वाजता जेवण आलं. रात्रभरच्या प्रवासाने अंग मोडून निघालं होते. समोरच्या स्क्रीन वरची सगळी करमणूक पाहून झाली होती. आता उत्सुकता होती जेवणाची. त्यातल्या पदार्थांची. माओरी(न्युझीलॅंड मधले मुळ निवासी) हवाई सुंदरीने जेवणाचे दोन प्रकार संगीतले. बीफ आणि चिकन. उच्चार समजुन घेतल्यावर समजलं. एक डिश गोमांस आणि दुसरी चिकन. आम्ही चिकनची डीश मागीतली. समोरची फळी ओढून जेवणाचा ट्रे ठेवला. सजवलेला ट्रे पाहून भुक चाळवली. चिकन सॅन्डविच,फॉईलने झाकलेल्या छोट्या आयताकृती वाडगा. फळांच्या तुकड्यांनी भरलेली वाटी. काटे, चमचे. फळांच्या वाटीत मधुर फळांच्या तुकड्यात सहज मिसळलेल्या कोलंब्या,झाकलेल्या फिल्म मधुन दिसत होत्या. ट्रे वरची फॉईल उघडली. पहातो तर काय? ट्रेचा अर्धा भाग चक्क साबुदाणा खिचडी आणि अर्ध्या भागात कुठल्याशा सॉस मध्ये माखवलेले चिकन चे तुकडे. कुतुहलाने डीशकडे पाहणाऱ्या मला शेजारच्या गोऱ्या प्रवाशाने महिती पुरवली. कॉंटीनेंटल की काहीतरी तो पुटपुटला. मी म्हणालो नो “धीस इज आषाढी ॲंड गटारी डिश”. त्या प्रवाशाला काही समजले नाही,पण बायको मात्र हसली.

दुपारी एकच्या नंतर एवढ्या मोठ्या विमानात हालचाल थांबली. सगळे प्रवासी जेवणाच्या धुंदीने झोपेच्या आहारी गेले. हवाईसुंदऱ्या अद्रृष्य झाल्या. विमानाच्या खिडक्या बंद होत्या. एक मंदसा अंधार. मी झोपेतुन मध्येच जागा होऊन घड्याळ पाहीले. दुपारचे तीन वाजले होते. सगळेच थकवा घालवण्याच्या प्रयत्नात झोपा काढुन घेत होते. बहुतेक पायलटनेही विमान ऑटोपायलट मोडवर टाकले असावे. मी सहज समोरच्या स्क्रीनवर विमानाचे लोकेशन पाहीले. वेळ एक ते चारची होती पण आमचे विमान हिंदी की पॅसिफीक महसगरावर होते.

संध्याकाळी चहा, कॉफी झालं. आता झोप पुर्ण झाली होती. जपानी सिनेमा पाहुन झाला. आईल सीट असल्यामुळे सहज उठून मार्गीके मध्ये फिरता येत होतं. पाय मोकळे करण्या साठी विमानाच्या शेपटीच्या भागापर्यंत फेरी मारली. पडद्या आडच्या केबीन मध्ये खानपानाची कपाटं व्यवस्थीत लाऊन ठेवली होती. हवाई स्टाफ आपअपल्या खुर्च्यांवर बसुन घटकाभर आराम करीत होता. मी सॉफ्ट ड्रिंक चे दोन कॅन मागुन घेतले आणि सीटवर येऊन बसलो. रात्रीच्या जेवणची वेळ झाली तरीही विमानाचे लोकेशन महासागरा वरच दिसत होते. मध्येच बरीक बारीक ठिपक्यांची बेटं दिसत होती. त्यावरून अंदाज बांधला आता थोड्याच वेळात मोठी जमीन दिसेल.

Image

रात्रिच्या जेवणात खिमट आणि त्यात घोळवलेला मासा. मसाला नसलेला. आम्ही ते सोडून केक खाल्ला आणि विमान लॅंड‌ व्हायची वाट पाहू लागलो. आधी पाच तास आणि हे दहा तास हवेत तरंगुन कंटाळा आला होता. इतक्यात पायलट ने अनाउन्समेंट केली. “सीटबेल्ट बांधा आपण ऑकलंड विमानतळावर उतरतोय”.

विमानातून उतरलो तेंव्हा रात्री चे साडे अकरा वाजले होते. विमानतळवरची वर्दळ शांत झाली होती. ह्या विमाना नंतर पहाटे पर्यंत विमानतळ बंद रहाणार‌ होता. कस्टम सह सगळ्या कर्मचाऱ्यांना घरी जायची घाई होती. तरीही ड्युटीचा भाग म्हणून एक्सरे मध्ये बॅगांची तपासणी सुरू होती. आमची भली मोठी बॅग कस्टमच्या बाईने बाजूला काढली. बॅगेतल्या एका डब्यात त्यांना पांढरट पावडर दिसली होती. विचारले असता हीने त्या बाईला समजावले अग बाई ह्या पावडररने दिवळीसाठी चकल्या करणार आहोत. भाजणीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ह्याचा विचार मी करीत होतो. त्या बाईला काम संपवून घरी जायची घाई झाली होती. तीला समजावताना हीने इंग्लिश ची बरीच कसरत करुन ही वस्तू दिवाळी फेस्टीवल मध्ये घरी कुक करून खाण्यासाठी आहे. “नथींग इज रॉंग”. “ओके ओके नो सीड्स,नो ॲनिमल मीट ?” तिचं समाधान झालं. आम्ही बाहेर पडलो. आमच्या पाठोपाठ एअरपोर्ट चे कर्मचारी निघाले. दरवाजे बंद करून. समोरच मुलगा आणि सुन आमची वाट पाहत उभे होते!

विलास देशमुख

बोरीवली, मुंबई

२१/११/२४