गेस्ट हाऊस
***गेस्ट हाउस*** मे महिन्याची सुट्टी.दोन्ही मुलांच्या परिक्षा संपल्या होत्या. दोन-तीन दिवस मुबई बाहेर जायचे ठरले.सुट्या असल्यामुळे हॉटेल्स भरलेली होती.आधीपासुन बुकींग न केल्यामुळे कंपनीचे गेस्ट हाउसही रीकामे नव्हते.शेवटी एक प्रयत्न करुन पहावा म्हणून बायकोने तीच्या अॉफिस मध्ये चौकशी केली.नशीबाने एक खोली रीकामी मिळाली.कुणीतरी बुकींग कॅन्सल केले होते.अॉफिस मधून येताना बुकींगची पावती घेउनच आली.मुले खुश झाली.आयत्यावेळी गेस्ट हाउसची खोली आम्हाला मिळाली होती.
शनीवार होता.सकाळी बोरीवलीहून निघालो.नाशीकजवळ हायवे वरून उजवी कडे देवळाली कडे जाणारा फाटा फुटतो.सुरुवातीला उजाड भाग.थोडे पुढे गेले की द्राक्षांच्या बागा.काही ठिकाणी कांद्याची लागवड दिसते.गाव सोडुन एक रस्ता छावणीमध्ये जातो.”देवळाली” भारताच्या तोफखान्याचे मोठे केंद्र.तोफा म्हटल्या की बोफोर्स तोफा आठवतात.त्यांची करगीलमधली कामगीरी आठवते. मोकळे रस्ते.मोठी परेडची मैदाने ओलांडली की गावा बाहेरचा धोंडी रोड लागतो.डाव्या बाजूला टेकडी वरचे खंडोबा मंदीर. पुढे उजव्या बाजूला बंगल्यांच्या रांगा.त्यातलाच हा अवाढव्य कौलारू बंगला.मुंबईला असली घरे पहायला मिळत नाहीत.
रस्त्यावरुन फाटक उघडून आत आले की भले मोठे अंगण.रस्ता आणि अंगण ह्यांच्या मध्ये कुंपण व कुंपणावर चिंचेच्या झाडांची रांग.अर्धे अंगण चिंचेच्या गर्द सावलीने झाकलेले.समोरच मोठा व्हरांडा. व्हरांड्याच्या दोन्ही बाजुला एक-एक खोली. मध्यभागी दिवाणखान्यात जायचा दरवाजा. आतमध्ये ऐसपैस पसरलेला दिवणखाना.उंच छत.त्यावर असलेलं भल मोठ्ठ झुंबर.दिवाणखान्याच्या चार ही कोपऱ्यांत चार खोल्या.मध्यभागी मोठे डायनींग टेबल.एका बाजूला कॅरम,बुद्दीबळाची टेबले.मागच्या बाजूला बाहेर जायला दरवाजा.हा दरवाजा उघडून पायऱ्या उतरल्या की स्वयपाक घर.येथे तुम्ही स्वत:स्वयंपाक करू शकता किंवा मावशींना सागु शकता.शहराच्या धावपळीतून आरामासाठी ही एक उत्तम जागा होती.
पुर्वी सैन्यात असलेल्या पारशाचा हा बंगला.आता कंपनीला भाड्याने दिला आहे.त्यांचे वंशज मुंबईत रहातात.केअर टेकर प्रकाश सहकुटुंब तेथे असतो.फाटकाच्या बाजूला स्वतंत्र खोली त्यांच्यासाठी आहे.
तेथे पोहोचताच मावशींना वांग्याची भाजी आणि भाकरीचे जेवण बनवायला सांगीतले. बंगल्याच्या मागील भागातील मोठी खोली आम्हाला मिळाली.जून्या पध्दतीचे दरवाजे ,उंच छप्परातून लाब सळईवर लोबकळणारा जून्या जमान्यातला पंखा लक्ष वेधून घेत होता.आवरून चहा घेतला.मुले केव्हाच अंगणात पळाली.आम्ही व्हरांड्यात आराम खुर्च्या घेउन बसलो.आधी आलेल्या पाहुण्यांशी गप्पा झाल्या.जेवण होईपर्यंत निवांतपणा होता.मी इअरफोन लावुन अभंगवाणी ऐकण्यात दंग होतो.बायकोचे पुस्तक वाचन चालू होते.सुहास शिरवळकरांची कुठलीशी रहस्य कथा होती.
जेवण झाल्यावर भुगूरला जायचे ठरले.तेथून पाच किलोमीटर वर भुगूर. मुलांना बिलकूल उत्साह नव्हता.मीच जबरदस्तीने सगळ्यांना घेऊन गेलो.गावात एक मजली वाडा.जुन्या पध्दतीच्या खोल्या.पुर्ण वाडा डोळेभरून पाहून घेतला. हा वाडा होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा.त्यांचे बालपण ह्याच वाड्यात गेले होते.
पुर्ण दिवस प्रवासात गेला होता त्यामुळे रात्री झोप केंव्हा लागली ते कळलेच नाही.
दुसरा दिवस रवीवार.बायकोला बातमी लागली, रवीवारी आठवडी बाजार भरतो.दहा वाजता पोहे खाऊन आम्ही बाजारात गेलो.शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करता आली.मुबईपेक्षा स्वस्त.
आज कोंबडीचा बेत होता. दुपार झोप आणि पुस्तक वाचनात गेली. संध्याकाळी टेकडीवरचे खंडोबा मंदीर पाहीले. देवळालीच्या बाजार रोडवर रात्रीचे खाणे झाले.बंगल्यात परत आलो तेंव्हा अंधार पडला होता.सकाळची सर्व मंडळी मुंबईला निघून गेली होती.सोमवारी त्यांना अॉफिस गाठायचे होते.
आता त्या आख्या बंगल्यात फक्त आम्ही चौघेच होतो. मावशी किचन बंद करून घरी नीघाली. दिवाणखान्यातल्या झुंबराचा लाइट बंद केला. दरवाजा आतून बंद करून घ्या म्हणाली.
रस्त्यावरच्या तुरळक वाहनांचा आवाज हळूहळू शांत झाला.मुले दमली होती.लगेच झोपली.वातावरण एकदम शांत झाले.मुंबईच्या मानाने ती शांतता भयाण वाटू लागली.खोलीचा दरवाज्याला कडी घालून आम्ही पण झोपलो.
रात्रीचे बारा वाजले असतील. बायको मला जागे करू लागली.म्हणाली “खोलीचा दरवाजा कुणीतरी ठोठावतय”.ती घाबरली होती.मी शांतपणे अंदाज घेतला.खरोखरच हलकेच दरवाजा ठोकल्याचा ठक ठक ठक असा आवाज येत होता. मध्ये काही सेकंद शांतता. आणि पुन्हा तशीच ठक ठक ठक दबक्या आवाजात ऐकू आली.आता घाबरायची पाळी माझी होती.चेहऱ्यावर तसे काहीही जाणवून न देता मी शांत होतो.मनामध्ये राम राम चालू होते. ठरावीक वेळाने ठक ठक चालूच होती.एवढ्या रात्री कोण असेल? दरवाजा उघडावा की नाही ह्या विचारात मी वरती पाहीले.नाईट लॅंपच्या मंद उजेडात छतावर लोबकळणारा जुना पंखा लयबद्द फिरत होता.ह्या लयीचा आवाज दारावरच्या ठकठकीशी मिळता जुळता होता.
मी शांत पणे उठलो.दरवाज्या जवळ गेलो. पुढे काय होणार असा चेहरा करून बायको पहात होती.दरवाज्याजवळ असलेले पंख्याचे बटन बोटाने बंद केले. पंखा फिरायचा थांबला तशी दरवाज्यावरची ठकठक थांबली.एका बोटाने मी बाहेरच्या भुताला पळवुन लावले होते.
पहाटेचे तीन वाजले होते.बायको पुन्हा दबक्या आवाजात मला म्हणाली “बाहेर घुंगरांचा आवाज येत आहे.कूणीतरी धावतय”. मी म्हटले “गुपचूप झोप आता.तूझे काही तरीच असते”.माझी झोप चाळवली होती.मी पडून आवाजाचा अंदाज घेऊ लागलो. पालापाचोळ्यावर घुंगरू घालून धावल्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता.आवाज लांब पर्यंत जात होता आणि पुन्हा जवळ येत होता.तो भास नक्कीच नव्हता.आता हे काय नवीन संकट?
माझी झोप उडाली.खिडकीचा दरवाजा थोडा सरकवला आणि बाहेर आवाजाच्या दिशेने पाहीले तेथे कुणीच नव्हते.होता फक्त सगळीकडे पसरलेला काळा कुट्ट काळोख.लांब पुन्हा आवाज ऐकु आला आणि मोठा होत होत जवळ येऊ लागला. आवाज रात्रीच्या शांततेत जास्तच घुमत होता. पाला पाचोळ्याचा आवाज त्यात मिसळत होता.त्याने भयाणतेत आणखी भर पडत होती.मनात विचार केला,आपली खोली तर बंद आहे.आत कुणी येऊ शकणार नाही .विचार करता करता पुन्हा झोप केव्हा लागली कळलेच नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून आम्ही निघालो. फाटकात थोडावेळ उभे होतो.रस्त्यावरुन सैन्याच्या तोफांचे ट्रक जात होते.चौकशी केली तर समजले . लांबच्या डोंगरात सरावासाठी ह्या तोफा नेतात.
इतक्यात पुन्हा घुंगरांचा आवाज ऐकू आला.आम्ही एकमेकांकडे पाहीले.बंगल्याच्या मागून एक काळा कुत्रा धावत शेपटी हलवत समोर आला.त्याच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज ट्रकच्या आवाजातही ओळखीचा वाटत होता.
विलास देशमुख