*अवघाची संसार*
*अवघाची संसार*
२१फेब्रुवारी.जयश्री गडकरांचा जन्मदिन.
यु ट्यूब चाळताना त्यांचा “अवघाची संसार” हा चित्रपट समोर आला.जरासा पहावा म्हणून डोकावलो आणि संपुर्ण सिनेमा पहात बसलो.
“मिया बिबी राजी तो क्या करेगा दाजी?.”
हे वाक्य आहे मुलींचा बापाच्या तोंडी.
दामु अण्णा मालवणकर,पाच मुलींची लग्न जमवीण्याच्या प्रयत्नात असलेला बाप!
त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी साकारली आहे इंदिरा चिटणीस यांनी.आपआपल्या क्षेत्रात उच्चशिक्षित असलेल्या मुली. त्यांच्याच क्षेत्रातील तज्ञ नवरे मिळवण्याचा हट्ट.त्यामुळे वाढलेली वयं.
आपल्या उच्च शिक्षणच्या फुशारक्या मारणाऱ्या मुली.
जेंव्हा नउवारी साडी नेसलेली आई,साधी वाटणारी गृहिणी त्यांच्याशी अस्खलित इंग्लीश मध्ये संवाद साधते,तेव्हा दामु अण्णांसह पाचही मुलींना बसलेला आश्चर्याचा धक्का पहाण्या सारखा आहे.
राजा गोसावी आणि शरद तळवळकर हे तरुण मित्र फोटो स्टुडीयो चालवतात.दोघेही विनोदी कलाकार.त्यांच्या गमती पहाताना मजा येते.
राजा गोसावी आणि जयश्री गडकर यांची प्रथमभेट.नंतरच्या भेटीगाठी.पून्हा भेटीची तळमळ,एकमेकांबद्दलची ओढ त्यांच्या अभिनयात पहायला मिळते.जयश्री गडकरांनी साकारलेली बॅंकेत काम करणारी मुलगी.शंभराची नोट हरवली असतानाची चेहर्यावर ची तगमग.तसेच सदानंदच्या भेटीत म्हटलेलं “इश्श्य!”
दामु अण्णांना भेटायला आलेल्या राजा गोसावींना आनंद होतो. तो “ मिया बिबी राजी तो क्या करेगा दाजी?.”ह्या अण्णांच्या वाक्यामुळे.पण इंदिराबाई चिटणीसांच्या अटी मुळे त्यांचा हिरमोड होतो.चार मोठ्या मुलींची लग्न आधी आणि नंतरच छोटीचं.चौघींची लग्न जमविण्याचे आव्हान.त्यात होणार्या गमतीजमतीसह पुढे सरकणारा सिनेमा सारखं हसत ठेवतो.
लग्न जमवण्याचे प्रयत्न.
हिंदीतल्याअमिताभचे विनोदी बोलणं,हातवारे आपल्यालाआवडतात पण राजा गोसावींच्या अभिनयातून, बोलण्यातून मराठीचा आपलेपणा भरलेला आहे.
चुपके चुपके मधला बॉटनी शिकवणारा अमिताभपेक्षा मानसशास्त्र शिकणारे शरद तळवळकर आपले वाटतात.
नृत्य न जाणणारे रमेश देव नृत्यांगनेच्या प्रेमात पडतात.त्यांना राजागोसावींची साथ.तीही होणार्या बायकोच्या मोठ्या बहिणींची लग्न आधी व्हावीत ह्या अटीची पुर्तता करण्यासाठी.
गाता न येणाऱ्या विवेक ना उत्तम गायिका असलेल्या मुलीच्या प्रेमात पडण्यास भाग पाडताना पडोसन मधले सुनील दत्त आणि किशोर कुमार आठवतात.
सायकल पटू ला खेळाडू मुलीच्या प्रेमात सहज गुंतवण्याचे कसब पहाताना राजा गोसावींचे अभिनय कसब पहायला मिळते.
स्वतःच्या लग्नाचा मार्ग सुकर करणे हेच ह्या मागचे प्रयोजन.
राम भजन कर लेना रे भाई….
रुपास भाळलो मी….
फुले स्वरांची उधळत भवती
गीत होई साकार …आज मी आळवीते केदार
जे वेड मजला लागले…
आली सखी आली,प्रियामिलना…
बहरुन ये अणुअणु….
कथा,पटकथा,संवाद मधुसुदन कालेलकरांचे.
वसंत पवार संगीतकार.
आणि एकापेक्षा एक बहारदार गाणी लिहिणारे
डाॅ वसंत अवसरे
हे वसंत अवसरे कोण ते वाचकांनी सांगावं.
पुढे चारही मुलींची लग्न होऊन.सुमनचं(जयश्री गडकर)आणि सदानंदचं (राजा गोसावी) लग्न होतं का?
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला संकुलातले सगळे भारतीय एकत्र येऊन राष्ट्र भक्तीचा सिनेमा पहातात.
२७फेब्रुवारी,मराठी भाषा दिवस!
ह्या दिवशी पहाण्या साठी हा हलका फुलका नर्म विनोदाने भरलेला सिनेमा संकुलात सगळ्यांनी एकत्र पहाण्यात नक्कीच मजा येईल.
सत्तरीतले आठवणीत रमतील,तरुणांना तेंव्हाची प्रेमळ कथा पहाता येईल.
आणि हो,मराठी भाषा दिन साजरा होईल!
विलास देशमुख
बोरीवली, मुंबई
२१/०२/२६