*गोऽऽऽविंदा!*
*गोऽऽऽविंदा!*
नुकतंच लग्न झालं होतं.नविन स्वप्न पहाण्याचा तो काळ होता.कुणीसं म्हटलं की “बालाजीला जाउन या.त्याच्या दर्शनाने समृध्दी येते.” हे ऐकुन ठरवलं होतं तिरुपती बालाजीला जायचं.वर्षे भराभर गेली.मधल्या काळात भारतातील बहुतेक ठिकाणं पाहून झाली.तिरुपतीच्या बालाजीचं दर्शन मात्र राहून गेलं होतं.अडतीस वर्षां नंतर नोकरीतून निवृत्त झालो.
भारावलेली भाषणं,शाल,ढाल,हार घेऊन घरी आलो.दोन दिवसांनी बँकेच पासबुक भरुन आणलं आणि बालाजीचं दर्शंन राहून गेल्याच जाणवलं!
2025च्या मे महिन्यातला शुक्रवार.संध्याकाळी पूण्याला मुक्काम.शनिवारी सकाळी निघालो.कात्रज घाटाच्या पलीकडे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ठिकाणी मिसळ आणि चहा.खेड शिवापूर टोळ नाक्याच्या पुढे नारायणपूर दत्तमंदिर.गाडीतुनच नमस्कार केला.पुढे ट्रॅफिक.ट्रक्सची लाईन.रस्ता रुंदीकरणाचे काम.गर्दीतुन पुढे जात,एका चौकात डावीकडे वळलो.दोन्ही बाजूला शेतं पहात भरधाव निघालो.सरळ रस्ता जेजुरी कडे गेला आहे.उजवीकडे वळून थोडं पुढे गेल्यावर देवळाचा परिसर.आतमध्ये पार्कींग साठी भरपूर जागा.चप्पल स्टॅण्ड,फोन ठेवण्यासाठी लॉकर.समोरच दिसणारे गोपुर.पुढे छोट्या सिमेंटच्या पायवाटेने दर्शन रांगेत जाऊन थांबलो.दर्शनाला जास्त थांबावं लागलं नाही.लांब गाभाऱ्यातल्या गोविंदाचे दर्शन झालं.बरेच वर्षांची इच्छा पुर्ण झाली.आवारात अनेक छोटी देवळं सजवली होती.धर्मशाळेच्या चौथऱ्यावर बसलो.शांतता.शहरापासुन दूर मोकळ्या वातावरणातला परिसर.दुपारचं उन असुनही शांत वाटत होतं.प्रसादाचं जेवण सुरू होतं.आम्हाला संध्याकाळी पुण्यात पोहोचायचे होतं.येताना.सातारा रोड वरून आलो.शंकर महाराज मठ,अरण्येश्वर आणि पद्मावती ही देवस्थानं,करून कसबा आणि दगडूशेठ गणपतीला पोहोचायला संध्याकाळ उलटून गेली.पुण्यात मुक्काम आणि रविवारी सकाळी मुंबई कडे निघालो.आंध्र प्रदेशातल्या मुळ बालाजीच्या ऐवजी महाराष्ट्रातल्या प्रती बालाजीचे दर्शन झालं होतं!
जुलै महिन्यात पावसानं थोडी उसंत घेतली होती.प्रती बालाजीचे दर्शन झालं होतं.तरीही मुख्य बालाजीला जाण्याचं डोक्यातून काही जात नव्हतं.भल्या पहाटेच निघालो.विमानाने चेन्नई.चेन्नईहुन मेट्रो.तीथून एक भला मोठा बसस्टॅंड.बऱ्याच बस लागल्या होत्या.बसच्याबोर्डावरची भाषा वाचता येणं शक्य नव्हतं.मी काळ्या कुट्ट कंडक्टरला विचारायला गेलो.मराठीतच बोललो.नाहीतरी हिंदी कळणारच नव्हतं.मला वाटलं एखादा महाराष्ट्रातला रजनीकांत भेटेल.पण कसलं काय.दक्षीणी भाषेतले त्यांचे “तिरपती,तिरपती” असे शब्द कळले आणि बस मध्ये चढलो.बस एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहे हे कळायला भाषेची गरज लागली नाही.तामिळनाडूचा नंबर असलेली बस पाहून आंध्र प्रदेश मधल्या पोलीसने बस थांबवून ड्रायव्हरला अगम्य भाषेत सुनावलं.दक्षिणेकडची भाषा समजली नाही तरीही पोलीसी भाषा कळायला वेळ लागला नाही.पायथ्याला बस दुपारी दोनच्या सुमारास पोहोचली.साध्या हॉटेल मध्ये जेवण.समोरच बस स्टॅंडवर देवस्थानाला जाणाऱ्या बस चा कंडक्टर ओरडत होता.तिरूमला,तिरुमला!
रहायला खोली मिळवली.देवस्थानाने व्यवस्थे साठी कॉम्प्युटर चा उपयोग उत्तम केला होता.भक्तांचा थोडा गोंधळ उडत होता पण नंतर सगळं सुरळीत झालं.थोडा आराम.नंतर रात्रीचं जेवण.त्या नंतर दर्शनाच्या रांगेत.आमच्या कडे ऑन लाईन बुकींग नव्हतं.कुठल्याशा चप्पल स्टॅंडवर चपला ठेवल्या.कितीतरी रांगेचे पुल,कठड्यांच्या बाजूने आम्ही पुढे सरकत होतो.एके ठीकाणी काही समाजसेवी मंडळी गरम दुधाचं वाटप करीत होती.त्यांच बोलणं मराठीत चाललं होतं.विचारल्यावर समजलं ही मंडळी कोल्हापूर हुन आली होती.भक्तांचे लोंढेच्या लोंढे येतच होते.
मुख्य इमारतीत शिरल्यावर आधार कार्ड दाखवून एक चिठ्ठी मिळाली.गर्दीत स्वतःला ढकलुन घेत पुढे जात होतो.काही निमुळते जिने आणि वाटा पार केल्यावर मोठाल्या पिजऱ्यांच्या खोल्या होत्या.त्या खोल्यांमध्ये आम्हाला बसवण्यात आलं. रात्रीचे नऊ वाजले असतील.आमचा पिंजरा २९नंबरचा होता.
ह्या पिंजऱ्यामध्ये बायका,मुलं,बाप्ये,तरुण,तरूणी ह्यांनी मिळेल त्या जागा पटकावल्या.बऱ्याच जणांनी लादिवर अंग पसरून टाकलं.शहरी शहाणपणा दाखवत मी बराच वेळ उभं राहून पाहिलं.पिंजऱ्याचे दरवाजे काही उघडत नव्हते.पायांना जास्त त्रास न देता मी ही बसलो.ही तर आधीच बसुन समोरच्या टीव्ही वरचा मद्राशी भक्त प्रल्हाद सिनेमा बघण्यात गुंग झाली होती.त्या न कळणाऱ्या भाषेचा मोठ्या आवाजाने धड झोप पण येत नव्हती.एका जागेवर बसुन चार तास झाले होते.काही जणांनी आल्या बरोबर अंग का लोटून दिलं ते मला कळलं!
असे एक एक पिंजरे उघडत होते.गर्दी कंट्रोल करण्याचा तो एक उपाय होता.पलिकडला पिंजरा उघडला की तिथले भक्त जोरात ओरडायचे.गोविंदा गोविंदा गोविंदा.आवाजाने झोपेतुन गडबडून उठलेले भक्त आपला पिंजरा उघडला नाही हे पाहून पुन्हा आडवे व्हायचे. आमचा पिंजरा शेवटचा होता.उघडल्यावर अर्ध्या तासातच दर्शन झालं.दर्शनाच्या दरवाज्या जवळचे गणवेशधारी कर्मचारी सगळ्यांना क्षणभरा पेक्षा जास्त दर्शन घेऊन देत नव्हते.त्यातही भक्त सुखावत होते.इतक्या वर्षांनी मुख्य बाळाजीचं दर्शन होत होतं.लांब गाभाऱ्यात दिसणाऱ्या व्यंकटेश्वराच्या मुर्तीला नमस्काराचा हात मी छाती पासुन नाका पर्यंत नेला,इतक्यात मला एका कर्मचाऱ्याने पुढे ढकलले त्यावेळीरात्रीचे दोन वाजले होते.असो देव भक्तीचा भुकेला असतो.त्या शिवाय का जगभरातून एवढी भक्त मंडळी इथे येतात?
एकदा जोरात गोऽविंदा म्हणालो आणि गोपुराला नमस्कार केला.समोरच प्रसादाच्या लाडू विक्रीच्या संकुलात शिरलो. चप्पल स्टॅंड शोधण्यात विना चप्पल ची तासाभराची पायपीट सुखकर वाटली.भक्त निवासाजवळ आलो तेव्हा रस्त्यावरचे स्टॉल वाले सकाळच्या उपमा आणि कॉफीची तयारी करीत होते.एका स्टॉल वाल्याने मला व्यंकटेश्वराऽऽ गोऽविंदा असे म्हणून नमस्कार केला.मी ही केला. त्याचा त्या दिवशीचा पहिला ग्राहक मी होतो.कॉफीचा!
सप्टेंबर सरत आला होता.नवरात्रीत मुलांकडे अमेरीकेत आलो.इथे नवरात्र नाही की नाचाचा गरबा नाही.सगळी मंडळी रुटीन कामकाजात व्यस्त.अष्टमी असल्याचं व्हॉट्सॲप वर समजलं.मुलाचे मित्र शेजारीच रहात होते.भेटायला आले. आग्रह केला.गुरूवारी देवळात जाण्याचा.आम्ही नाही नाही म्हणत होतो.उगाचच त्यांच्या दिवसभराच्या धावपळीत आपला त्रास कशाला.”नो नो अंकल,बी रेडी ऑन थर्सडे इव्हीनींग.वी विल लीव्ह ॲट सीक्स फोर्टी फाइव्ह शार्प”
आम्ही आधीच तयार होतो.मित्र ऑफिस मधुन बरोबर सहा वाजता आला. येथे येऊन भारतीय वेळ पाळण्यास शिकतात.भारतीयच काय इथला निसर्ग पण वेळ पाळतो.हवामान खात्याने म्हटले “दुपारी दोन वाजता पाऊस येणार” की पाऊस दोन वाजताच सुरू झालेला मी पाहीला.आम्ही तिघं आणि दोघे मित्र घरा समोरच्या रस्त्यावर आलो.आम्हाला वाटलं ऊबरची एसयूव्ही करावी लागेल.इतक्यात मित्र बाजूलाच उभ्या असलेल्या मोटारी कडे गेला.ड्रयव्हर सीट वर बसून आम्हाला बोलवू लागला.पहातो तर काय,चक्क टेस्ला कार.लाल रंगाची.मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागलो.भारतातल्या मोटारीं सारखा उघडला नाही,तेव्हा मित्राने आधी हॅंडलच्या एका टोकाला स्पर्श केला आणि हॅंडल ओढलं.इलेक्ट्रॉनीकचा वापर पहिल्याच स्पर्शात दिसून आला.चौकात सिग्नल मिळाल्या बरोबर उजवीकडच्या रस्त्यावर वळून गाडी मुख्य रस्त्याला लागली तेव्हा स्पिडोमीटर ७५चं स्पीड दाखवत होतं.७५मैल प्रती तास.म्हणजेच ११०किमी प्रती तास!
तासाभराच्या प्रवासा नंतर एक एक्झिट घेऊन गाडीने हाय वे सोडला.”ब्रीज-वाटर” नावाचं गाव.टुमदार घरांची वस्ती,वळणा वळणाचे रस्ते.एखादं खेडेगाव असावं.पोहोचे पर्यंत काळोख पडला.रस्त्यावर दिवे नव्हते पणआखलेले पांढरे पट्टे गाडीच्या दिव्यांनी स्पष्ट दिसत होते.लांब मैदानात दिव्यांचा प्रकाश दिसला.मोठ्या पटांगणात पार्कींग ची व्यवस्था.पाचशे गाड्या सहज पार्क केलेल्या.एक रिकामी जागा पाहून गाडी पार्क केली.गाडीतून उतरताच अंगावर गार वारा आला.आकाशाकडे नजर जाताच दिसलं मंदिराचे गोपुर.त्याच्यावर रेंगाळलेला चंद्र.अष्टमी कडून कोजागीरीकडे जाणारा.मित्रांनी आम्हाला देव दर्शन घडवण्यासाठी दिवस निवडला होता *दसऱ्याचा!*
मंदिरात चप्पल स्टॅंड.पाय धुण्यासाठी गरम पाण्याचे नळ.
वेटींग हॉल मध्ये दसऱ्याचे औचित्य साधून देवादिकांच्या छोट्या छोट्या मुर्तींचे प्रदर्शन.भावीक फोटो घेण्यात व्यग्र.हॉलच्या एका दरवाजातून मुख्य दर्शनाची रांग सुरू झाली.रांगेच्या मार्गातच अनेक देवांच्या मुर्ती.त्यात उजव्या सोंडेचा गणपती,
मारूती,डाव्या सोंडेचा गणपती,इतर देव देवता त्यात शंकर पार्वती,राम सीता,राम सीता आणि वानर परीवार,लक्ष्मी नारायण,अंजनेय,अयप्पा,राधा कृष्ण तसेच नवग्रहांचा समुह.
सगळे परदेशी भारतीय नटुन थटुन आले होते.पंचवीशीतली नैना आणि पंचाहत्तरी ची नानी,सगळ्यांनी ठेवणीतल्या साड्या नेसल्या होत्या. भिंतीवरचे गीतेतले श्लोक वाचत रांगेतून पुढे सरकत होते.हॉलच्या एका कोपऱ्यात अभिषेका साठी काही लोकांची बैठक बसली होती. गुरूजींचे मंत्रोच्चार ऐकुन क्षणभर भारतातच असल्याचा भास झाला.मुख्य गर्भगृहाच्या जवळ आलो.स्वयंसेवक नम्रपणे इंग्लिश मध्ये दर्शन घेऊन पुढे जाण्यास सांगत होते.गाभाऱ्यात डोकावून पाहीले.पुन्हा एकदा दर्शन झाले होते
*व्यंकटेश्वर बालाजीचे!*.
प्रसन्न मनाने बाहेर पडायच्या मार्गावर तिर्थ प्रसादाचे वाटप सुरू होते.पुढे डावीकडे भोजनालय आणि उजवीकडे बाहेर जाण्याचा मार्ग.कॅंटीन मध्ये पैसे देऊन खाद्य पदार्थ.सेल्फ सर्वीस.
समोसा,भाजी पुरी,इडली,वडा आणि मसाला डोसा.बसायला हॉल मध्ये भरपूर टेबल खुर्च्या होत्या.आम्ही तिथे कॉफी घेतली.बाकीचे पदार्थ टू गो म्हणजेच टेक अवे करून घेतले.घरी खाण्यासाठी.त्यात चींचभात(Tamarind rice) हा दक्षिणेकडचा पदार्थ आम्ही पहिल्यांदाच खाणार होतो.बाहेर येऊन पहातो तर बहूतेक सर्व गाड्या निघून गेल्या होत्या.थंडीने हुडहुडी भरण्याच्या आधी गाडीत बसलो.
रात्रीचे नऊ वाजून गेले होते.देवळा जवळचा वळणा वळणाचा रस्ता.छोटी छोटी घरं.कोकणाची आठवण करून देत होती.त्यातच प्रत्येक घराच्या अंगणात दिसले हेलोवीन भुतांचे साफळे.पाहून थोडी भिंती वाटली.तासाभराचा परतीचा प्रवास.देवळातले प्रसन्न वातावरण.स्वच्छ थंड हवा.
पस्तीस वर्षात एकदाही जे जमलं नाही,ते मागील सहा महीन्यात तिनं वेळा जमुन आलं होतं.
तिन वेळा तिन वेगवेगळ्या प्रदेशातले बालाजी.दर्शनाचं समाधान,मोटारीतल़ं सांद्र संगीत,काचेचं छत,तुफान वेग,यांचा व्हायचा तो परिणाम झाला.
पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराचा मंडप.किर्तनकार बुवा अभंग म्हणत होते.
अगा वैकुंठीच्या राया । अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा । अगा वासुदेव नंदना ॥२॥
अगा पुंडलिक वरदा । अगा विष्णू तू *गोविंदा* ॥३॥
कान्होपात्रा…….
घराजवळ गाडी पार्क केली तेंव्हा हीआणि मुलगा माझा खांदा हलवून मला जागं करीत होते!
विलास देशमुख
जर्सी सीटी,न्यु जर्सी
०२/१०/२०२५
दसरा