वन्स मोअर !
शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या.
सह कुटुंब नाटक पहाण्याचे ठरवले.
सगळे तयार झाले.तरुण कलाकारांच्या संचात संगीत सौभद्र आलं होतं.आण्णासाहेब किर्लोस्करांच.
संगीत नाटक !
संगीत नाटक ऐकताच.
दिवाळीचा फराळ करायचा आहे हे कारण सांगून हीने माघार घेतली.मोठ्या मुलाला क्लास आठवला.
छोटा तयार झाला.महणजे त्याला मी तयार केला.त्यालाही दादाचं अनुकरण करायचं होतं.त्या आधीच त्याला आईस्क्रिमचं आमिष दाखवलं वचन दिलं आणि तो तयार झाला.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह.दोन तिकीटं.पहिल्याच रांगेतली.पेटी,तबलावाल्याच्या मागेच सीट होत्या.आम्ही लवकरच पोहोचुन जागेवर जाउन बसलो.
पडदा उघडला आणि समोर रंगीत कपडेवाली मंडळी रांगेत उभं राहुन गाणं म्हणायला लागली.”आमच्या स्कूल मध्येही असच उभं राहुन प्रेयर बोलतात.” मुलगा.
यथासांग समोरची माणसं नांदी आळवीत होती.नाट्यगृह भरल्याचे लक्षात येताच रांगेतल्या कृष्णाने खुण केली.सगळ्यांनी शेवटचं कडवं म्हटलं आणि नांदी संपली.
सुत्रधार “झाली उपवर श्री कृष्णाची भगिनी सुभद्रा….. पडद्या मागुन बोलत होता.
एक माणूस जंगलात फिरत होता.घनदाट जंगल.पितांबर.अंगरखा.डोक्यावर साधा फेटा. कपडे साधेच घातले पण चेहर्यावर तेज दिसत होतं.हातात बाण आणि खांद्यावर धनुष्य.
बाण हातात नाचवीत म्हणत होता.
“नाही झाले षण्मास मला राज्य सोडुनी…. आ आ आ आ ए ए ए ए आ आ आ आ…”
अरण्य,माणुस,धनुष्य,हातातला बाण पहात रमलेल्या मुलाची तंद्री भंग झाली. ती ह्या ओळीनं.
“का देवकीचा तनय कृष्ण वचन मोडीतो?……
नवल हेची मन मनी……”
त्याला मी दिलेल्या वचनाची आठवण झाली होती.आइस्क्रीमची आणि त्याने कोपराने माझ्या पोटात ढुशी द्यायला सुरुवात केली.
ती ही तबल्याच्या ठेक्यावर.बाबा बाबा आइस्क्रीम!
“नाऽरायण हरी नाराऽऽयण” म्हणत नारदाची एंट्री.त्याच्या हातातली विणा,गळ्यातल्या फुलांच्या माळा आणि हातातल्या चिपळ्यांकडे लक्ष होतं. एक हात विणेवर दुसर्या हातातने चिपळ्यांनी धरलेला ठेका.मुलगा चिपळ्यांकडे पहात असताना नारदाने गाणं सुरु केलं. “लग्नाला जातो मी….. “ गाणं ओळखीचं वाटलं .मुलाने .माझा शर्ट ओढून ते गाणं पुर्वी ऐकल्याची आठवण करुन दिली. बेंबट्याच्या बाबानी ह्या गाण्यावर मिळवलेला वन्स मोअर!त्याला आठवला. “देशपांडे आजोबांच्या कॅसेट मधली गोष्ट.” “असा मी असा मी”
देशपांडे आजोबा म्हणजे पुल.
”तुला अजुन आठवतय?” मी.
मनातल्या मनात मी पुलंचे आभार मानले.
पुढच्याच गाण्यात नारदाने गायला सुरुवात केली.
“तुज देउनी पार्था वचने,फसवीले तुला मुकुंदाने……”
हे ऐकताच मुलाला आइस्क्रीम च्या वचनाची आठवण झाली.
पुन्हा कोपराने…
राक्षसाची एंट्री.त्याच्या गडगडाटी हास्याने थोडी भिती वाटली.राक्षस,सुभद्रा महालातुन जंगलात.अर्जुनाची आणि तिची भेट.तो शेला तो रत्नहार पहाताना मजा वाटत होती.ह्या भेटीत दोघांनीही पदे म्हणुन घेतली.
“बलसागर तुम्ही वीर शिरोमणी……”
इथे मुलगा कंटाळला पण बाजुचे आजोबा वन्स मोअर देत होते.व्वा क्या बात है म्हणत होते.
“कोण आहे रे तिकडे”ह्या वाक्याने कृष्णाची एंट्री.
एका वाक्या नंतर तोही गाउ लागला.
“कोण तुज सम सांग मज गुरुराया……” कृष्ण.
शेजारच्या आजोबांनी मान डोलावलेली मुलगा पाहू लागला.
मी त्याची मान स्टेज कडे वळवली. हे करताच मुलगा माझ्या पोटात कोपराने आणखीन मारु लागला ते समोरच्या कृष्णाने पाहीलं.त्याने गाता गाता डोळे मोठे करुन आणि मान हलवून दटावण्याचा प्रयत्न केला.मुलगा शांत बसला.
मिष्कील कृष्ण.मकुटावरच पिकाॅकच पिस.बोलताना गाताना हलणाऱ्या मुकुटातल्या मोत्याचा तुरा लक्ष वेधून घेत होता.त्याच्याकडे पाहता पहाता थोडा वेळ गेला.कृष्णानेही पुन्हा गायला सुरुवात केली.आजुबाजूचे आजोबा माना डोलवून दाद देत होते.कृष्ण रंगुन गात होता.मुलाने एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि एकदा माझ्याकडे.एका पाठोपाठ सुरु असलेल्या गाण्यांचा आलेला कंटाळा.आईस्क्रिमची आठवण .ह्या दोन्ही गोष्टींचा राग काढण्यासाठी कोपराचा उपयोग होत होता.इतक्यात शेजारचे आजोबा जोरात ओरडले वन्स मोअर! मुलाने त्यांच्याकडे रागाने पाहिले.कृष्णाने शेवटचा अंतरा पुन्हा गायला.प्रेक्षकांतुन टाळ्या आणि वन्समोअरचे आवाज गुंजले.
पण यावेळी मध्यांतरासाठी पडदा पडला.हे पाहून मुलगा खुश झाला.त्याचं कारण म्हणजे आइस्क्रीम मिळण्याची वेळ आली आहे हे त्याला समजले होते.आईस्क्रिमच्या स्टाॅलवर आइस्क्रीम खाता खाता मुलाचा प्रश्न.”बाबा मराठी नाटक पाहुन ही मराठी माणसं इंग्लीश आणि हिंदी का बोलतात?” “ क्या बात है!” “वन्स मोअर!”?
मध्यांतरा नंतर
वद जाऊ कुणाला शरण….
अरसीक किती हा शेला….
किती सांगू तुला……
बघूनी सुभद्रेला कसा यती वेडावून गेला….
वसंती बघुन मेनकेला……
लाल शाल जोडी जरतारी…
बहुत दिन नच भेटलो सुंदरीला…
अशी कित्येक गाणी झाली.वन्स मोअर मिळत होते.गायकांची दमछाक होत होती.वेळ कमी पडू लागला.तसे सुत्रधाराने वन्स मोअर न देण्या साठी प्रेक्षकांना विनंती केली.
पुढे रागावलेली रुक्मीणी पहाताना हसु येत होतं.
“नभ मेघांनी आक्रमीले……”
कृष्ण रुसलेल्या रखुमाईचा रुसवा काढीत होता तो ही गाण्यातून.
“नच सुंदरी करु कोपा,मजवरी करी अनुकंपा……”
एव्हाना रुसवा गेला होता.गप्पा संपल्या होत्या.पहाटेचा मंद वार्याची चाहुल लागली होती.महालाच्या खिडकीतुन दिसणारा सुर्योदय.पक्षांची किलबील.कृष्णाने गाणे सुरू केले.
“प्रिये पहा….रात्रीचा समय सरून होत उष:काल हा आ आआऽऽ”
मुलाच्या तोंडून वा “क्या बात है” शब्द निघालेले मी तिरक्या डोळ्यानी पाहीले.रंगुन जाणं ह्याला म्हणतात का?
गाणं संपताच मुलगा उभा राहीला आणि जोरात ओरडला
“वन्स मोअर”! हे समोरच्या कृष्णाला ऐकु गेलं.कृष्ण हसला आणि शेवटचं कडवं पुन्हा म्हटलं.मुलाला नाट्य संगीत आवडू लागलं आहे हे कृष्णानं ओळखलं होतं!
अर्जुन सुभद्रेची भेट झाल्यावरही गोड गाणी ऐकायला मिळाली
मनेत्र गुंतले ग बाई…
बहुत छळियले नाथा….
पांडु नृपती जनक जया…
आताच्या तरुण कलाकारांनी गायलेली ही गाणी कानाला तृप्त करीत होती.ज्यांनी बालगंधर्वांची सुभद्रा पाहिली असेल,ऐकली असेल ते खरे भाग्यवान!
शेवटी अर्जुन सुभद्रेचं लग्न होतं.कृष्ण आशिर्वाद देताना म्हणतो “नांदा सौख्य भरे!”आणि पडदा पडतो!
बाहेर आल्यावर मुलाचा प्रश्न
“बाबा नांदा सौख्य भरे म्हणजे काय?”
मी रिक्षात बसताना म्हटलं”लग्न झाल्यावर कळेल!”
मुलगा मोठा झाला.उच्च शिक्षणासाठी अमेरीकेला गेला.आमच्याही अमेरीकेच्या फेऱ्या झाल्या.ह्या वर्षी मुद्दाम अमेरीका वारी केली.त्याला कारणही तसेच होते.मुलाचा एच वन बी विजा झाला नाही.त्याला अमेरीकेतुन परत यावं लागणार होतं.नंतर अमेरीकेला जाणं जमेल की नाही? हा प्रश्न होता. मागील फेऱ्यांमध्ये काही गोष्टी पहायच्या राहुन गेल्या होत्या.त्यातली एक गोष्ट म्हणजे ब्राॅडवे वरच्या एखाद्या नाट्यगृहात नाटक पहायचे राहुन गेले होते.एक दोनदा ब्राॅड वे वर फिरताना तिकीटाचे डाॅलर मधले दर पाहिले आणि सबवेची मेट्रो पकडुन परत फिरलो होतो.
सोमवारचं परतीचं विमान.आज शनिवार, मुलाला सुट्टी होती.सकाळीच फिरायला निघालो.फिरता फिरता दुपार झाली.समोरच दिसला ब्राॅडवेचा रस्ता.एका नाट्यगृहा समोर थांबलो.मुलाने खिशातुन तिन तिकिटे काढली.मंद प्रकाश.सांद्र संगीत.मऊ गालीचाचे आवरण असलेल्या पायर्यां.त्या चढुन प्रेक्षागृहातल्या आमच्या सीट वर जाउन बसलो.नाटक होतं “अल्लादीन-म्युझीकल ड्रामा!”
नाटक संपलं तेंव्हा संध्याकाळ झाली होती. एका माॅल मध्ये प्रशस्त बसण्याची जागा.आम्हाला एका चांगल्या जागेवर बसवून मुलगा लांबच्या काउंटर वर गेला.”हॅजेनडॅझ”,”फेवरीट डे” ही तीथली प्रसिध्द आइस्क्रीमं.ट्रे मध्ये तिन आइस्क्रीम चे कप घेउन आला.महागडा ब्रॅन्ड. मोठ्ठे कप.आवडता फ्लेवर.
म्हणाला “आरामात खा.काही घाई नाही.”आईस्क्रीम पाहून मी खुश झालो होतो.ही म्हणाली “अरे इथे आधीच इतकी थंडी त्यात आइस्क्रीम! आजाराला बोलावणं.”.
“काही काळजी करु नका.मंगळवारी तुम्ही मुंबईत अहात.
डाॅ.कोटकर काकांना व्हाॅट्सॲप करुन सांगीतलं आहे,दोन सर्दीचे पेशंट पाठवीत आहे.” त्याच्या बरोबर आम्हीही हसलो.
आईसक्रीम खाता खाता,पाहिलेल्या नाटकावर चर्चा झाली.नेपथ्य,ट्रीक सीन्स,समुह नृत्य,आकाशात उडणारी चटई मस्त!
मुलगा सांगत होता.”काही दिवसां पुर्वी इथल्या मराठी मंडळींनी नाटक केलं होतं. मराठी संगीत नाटक.बाबा ओळख पाहू”
“अरे मी कसं ओळखणार?किती तरी मराठी संगीत नाटकं आहेत.”
“बाबा ते नाटक होतं “संगीत सौभद्र” आणि प्रिये पहा…या गाण्याला मी वन्स मोअर मागीतला आणि कृष्णा ने पुर्ण पद परत म्हटलं.मज्जा आली.”
“हेच नाटक आपण दोघांनी बोरीवलीला मी लहान असताना पाहिलं होतं. आठवतय का?” मुलगा.
”हो ना.आठवतय की.पहिल्या रांगेतली तिकीटं होती. तुझ्या वन्स मोअर वर कृष्णाने गाण्याचा अंतरा पुन्हा गायला होता.”
“इंटरव्हल मध्ये आईस्क्रीम खाल्लं होतं.”
“आज नाटक पाहिलय.आइस्क्रीम झालय.”
“होउन जाउ दे आइस्क्रीमचाही वन्स-मोअर!”
विलास देशमुख
बोरीवली मुंबई.
९८२०३७२६७१