*क्लिफर्ड साहेब*
*क्लिफर्ड साहेब*
किक स्टार्ट वाल्या बुलेटच्या काळात लेचेपेचे तरूण बुलेट मोटार सायकल चालवायच्या भानगडीत पडायचे नाहीत.तशीच देहयष्टी असलेल्यांनीच बुलेट चालवावी.त्यांनाच ती शोभत असे. साहेब त्या काळात बुलेट वर यायचे.फॅक्टरीत येताना कितीतरी पोलीसांचे सॅल्युट घेऊन आले असतील.तसेच बऱ्याचदा त्यांच्या बुलेट वरच्या पर्सनालीटी कडे पाहून वाशी टोळ नाक्यावरही टोळ मध्ये सुट मिळत असे हे ते नेहमी हसत हसत सांगत.
१९८०चा दसरा.मुलूंड प्लांट मध्ये एक दिवस आधी मशिन्सची पुजा.माझा कंपनीतला पहिला दिवस.जेवणाची वेळ होऊन गेली,आम्हाला कळलंच नाही.”अरे तुम्ही लोक जेवायला नाय गेला?” पेपर चे रोल लावण्याच्या कामात जेवणाचं राहून गेलं होतं.मी आणि राजाराम ढोलम दोघं एकमेकांच्या तोंडाकडे पहात बसलो.जेवण राहून गेलं होतं हे पाहून हसूही आलं.हे पाहिल्यावर साहेब डिपार्टमेंटचा मोठा दरवाजा उघडून लगबगीने बाहेर पडले.थोड्या वेळाने येऊन म्हणाले.कॅंटीन मधे जाऊन जेवून या.कॅंनटीन मध्ये कुणीही नव्हतं.एका टेबलावर दोन ताटं मांडून ठेवली होती.काउंटरच्या पलीकडून स्वामीचा हसरा चेहरा दिसत होता.नोकरीच्या पहिल्याच दिवशी उपाशी रहाण्या पासुन वाचलो होतो.जेवण झाल्यावर स्वामीला विचारलं”वो साब का नाम क्या है?” स्वामी म्हणाला
“क्लिफर्ड”!
नोकरीचा पहिलाच दिवस,लक्षात राहिला तो क्लिफर्ड साहेबांमुळे आणि त्या जेवणामुळे.सहा फुटांच्या जवळपास उंची.उंचीला शोभेल अशी भरगच्च शरीरयष्ठी.उंची आणि जाडीच्या मापात थोडे पुढे आलेले पोट सावरत चालण्याची लकब.नेहमी सेकंड शिफ्ट ला दिसत.जनरल शिफ्टची वर्दळ संध्याकाळ पर्यंत संपत असे.रोटरी प्रिंटींग आणि सेलोफीन रीकव्हरी करायचे काम सेकंड शिफ्ट मध्ये चाले.आमच्या सारख्या नवीन उमेदवारांना सेकंड शिफ्ट मध्येच काम असे.ते म्हणजे.प्रिंटींगला लागणाऱ्या वेगवेगळ्या जातींचे रोल व्यवस्थीत लावून ठेवणे आणि सेलोफीनच्या रोल ची रीकव्हरी करणे.रोटरी प्रिंटींगच्या मशीनवरचे कठीण काम सोपे करून देण्याचे कसब साहेबांकडे होते.प्रींटींग कितीही कठीण असले तरीही ते पुर्ण करण्यास मदत केल्यावरच ते टेबलवर बसत.
रात्रीची वेळ.लांब लाल बहादूर शास्त्री महामार्गावर ची तुरळक वहातूक.दिव्याच्या प्रकाशात चकाकणारी पाणीदार हिरवळ.जॉन्सन आणि जॉन्सन कंपनी.मुलूंड.काचेच्या तावदानाच्या आत मशीन्सची मंद घरघर. एका टेबलावर बसलेले साहेब.पांढरा शर्ट खोचलेला.काळ्या पॅन्टवर करकचून बांधलेला बेल्ट.अशा अवतारात ते नेहमी बसलेले दिसायचे. बसलेले नसतील तर एखाद्या प्रिंटींग मशीनवर कठीण जॉबचे सेटींग करण्यात व्यग्र.प्रत्यक्ष कामा बरोबर त्या कामाची नोंदवहीत केलेली नोंद हे त्यांचं नित्याचं काम.झालेले काम पुढच्या शिफ्टला कळावे हा हेतू.नंतरच्या काळात कॉंप्युटरच्या जमान्यातही त्यांनी त्यांचे कस्टमर ऑर्डर फॉर्मचे जाडं रजीस्टर सुरू ठेवले होते.ऑर्डर्सचं बायबलच ते!
मुलूंड प्लांट मध्ये नेहमी दिसणारे क्लिफर्ड साहेब.अंधेरी प्लांटला सुरूवातीला दिसले नाहीत.सहा महिन्यांचा काळ लोटल्यावर एके दिवशी सेकंड शिफ्टला स्वारी डुलत डुलत डिपार्टमेंट मध्ये शिरली.हातात छोटी टिफीनची बॅग,चेंजीग रूमच्या कपाटात ठेऊन रोटरी प्रिंटींग मशिन कडे निघाली.रिवाईंडींग मशीन्सच्या बाजूचा सरळ रस्ता .नजर सरळ रोटरी मशीन कडे.रिवाईंडींग मशीनवर बसलेल्यांना त्यांच्याकडे पहाताना माना उंच करून पहावं लागतं होतं.नावा प्रमाणे क्लिफ म्हणजेच शिखर किंवा उंच कड्या सारखेच शांत.
डिपार्टमेंटचा भक्कम आधार.
कामगारांना ओरडण्याचा प्रसंग त्यांच्यावर क्वचितच यायचा.समोरून येताना पाहून सगळे आपआपल्या मशिन्सवर हजर.दुपारच्या टपालाच्या गाडीतून ऑर्डर्स यायच्या.त्यातले सोपे जॉब्स पहिल्या शिफ्टला संपून जायचे.त्यामुळे फर्स्ट शिफ्ट ची प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली व्हायची.यांच्या वाट्याला बॅक ऑर्डर मधले जूने आणि कठीण जॉब्स यायचे.मग हे स्वतः मशीनवर उभे राहून चार चार रंगाचे रजिस्ट्रेशन जुळवत बसायचे.त्यातले कठीण जॉब्स म्हणजे इंग्लिश इलेक्ट्रीक,बाबा जर्दा,इंडीयन ऑईल.हे जॉब्स आले की सगळ्यांची पळापळ.पण कामगारांना मदत करून रजिस्ट्रेशन जमवून पुर्ण करण्यासाठी शांत डोके आणि चिकाटी लागते.ती त्यांच्या कडे होती.
स्टाफच्या पिकनीकला त्यांची हजेरी असायची.पावसातली माथेरानची अशीच एक पिकनीक.ह्या पिकनीक बद्दल नेहमी सांगायचे.ते मुळ पार्ल्यातले रहिवासी.कॅथलीक ख्रिश्चन असुनही मुलांची नावं हिंदूंची.पार्ल्याच्या मराठी भाषेचा प्रभाव.मराठी बोलताना तेचा,हेचा अशा शब्दांनी मराठी खुलवायचे.बऱ्याचदा मराठीत साला आणि इंग्लिश मध्ये ब्लडी शब्दाचा वापर असायचा.मनासारखे काम पुर्ण करून सगळ्यात शेवटी डिपार्टमेंट मधुन निघताना बारीक शिळं वाजवत निघाले की समजायचं काम पुर्ण झाले आहे!
डॉ.बेक ह्या कंपनीची ऑर्डर.राईट-एन-प्रोटेक्ट,बनवायला कठीण,महागडे ड्रम लेबल्स.मोठा आकार,मोठी ऑर्डर.रिवांडींग करताना मुलींच्या लक्षात आलं की “बॅच नं” हा शब्द प्रिंटच झाला नव्हता.झालेल्या चुकीने डगमगुन न जाता.प्रत्येक लेबल वर “बॅच नं.” शब्द स्टॅम्प करून घेतला.चुक सुधारली,क्लिफर्ड साहेबांनी. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवामुळेच.चुक सुधारून ती लेबल्स क्वालिटी कंट्रोलवाल्यांनी चेक केली.
क्वालीटी चेक ओके झालं.कंपनीचं मोठ नुकसान टळलं!
“साहेबाच्या टायमाला….”अशी सुरूवात करून जुन्या गोष्टी सांगणाऱ्यातल्यां पैकी ते होते.त्यांचं नेहमी ऐकलेलं वाक्य म्हणजे “व्हेन आय वाज इन पेपर प्रोडक्ट्स….”.
मुळचे पार्लेकर असलेले साहेब पार्ल्यातल्या गोष्टी सांगताना रमुन जायचे.”दोज डेज इन अवर पार्ला बीग बीग बफेलोज,ऑन द रोड……“.बीग बीग हा शब्द प्रयोग त्यांच्याच तोंडून ऐकण्यात मजा होती. कंपनी तर्फे अमेरीकेला जाण्याची संधी त्यांना खुप उशीरा मिळाली.”न्यू ब्रुन्सवीक”,जॉन्सन अँड जॉन्सन चं मुख्य ऑफिस.इथून जगातील सगळ्या देशांमधील कारखान्यांची दखल घेतली जाते.एखाद्याला इथे जाण्याची संधी मिळणे हा गौरव मानला जात असे.न्यू ब्रुन्सवीक ला जाऊन आल्यावर तिथल्या गोष्टी सांगताना.तिथल्या ऑफिसच्या बाजूच्या रस्त्याचे वर्णन करताना त्यांनी सांगीतले होते.”इट्स लॉंग स्ट्रीट.फुल ऑफ ईटरीज.यू गेट ऑल टाइप ऑफ फुड.आय एट देअर मेनी टाईम्स.बीग बीग सॅंड्वीचेस!”
रमेशच्या जिवघेण्या आजारपणात त्याच्या सुट्ट्या संपल्या.थोडं बरं वाटल्यावर त्याला दिलेला सल्ला.”अरे साला तू नुसता येऊन बस.जास्त दांडी मारलीस तर कंपनी काढून टाकेल”.कामगारांची परीस्थिती त्यांना माहित होती.कामगारांकडुनही त्यांना मान मिळत होता.
“व्ही आर एस”! एवढे दिवस बाहेरच्या कंपन्या वर घोंगावत असलेलं भुतं आमच्याही कंपनीत आलं. जास्तीत जास्त कामगारांना “व्ही आर एस” घेण्यास तयार करणं हे डीटार्टमेंट हेड्सना सांगीतलं गेलं.ह्यांच्या डिपार्टमेंटमध्ये दोन टक्के कामगारांनी व्ही आर एस घेतली. प्लॉंटहेडनी ह्यांना वीचारलं .तेव्हा ह्यांनी सांगीतलं “मी त्यांना रोज सांगतो,पण कुणी फॉर्म भरायला येतच नाही”. त्यांची कामगारांविषयीची आपुलकी अशी होती.
रीटायरमेंट नंतरही जेंव्हा कंपनीला त्यांची गरज वाटली तेंव्हा त्यांना बोलावलं गेलं.ह्यातच त्यांच्या कामाची पावती दिसते.निवृत्तीच्या काळात लांबून बातम्या ऐकायला मिळायच्या ते चर्च मध्ये लोकोपयोगी कामं करतात.मित्रां बरोबर त्यांना भेटायला जायची आखणी व्हायची पण प्रत्यक्षात जमलं नाही.एकदा मात्र आम्ही सगळे जमलेलो असताना फोनवर बोलणं झालं.सगळ्यांच्या आठवणी काढल्या.सगळ्यांबद्दल भरभरून बोलले.
सहा महिन्यांपुर्वी बर्मन साहेब गेले.आता क्लिफर्ड साहेबांनी कायमची एक्झिट घेतली.अंधेरी प्लांटच्या प्रिंटींग डिपार्टमेंटचे दिग्गज आज आपल्यात नाहीत!
मागच्याच वर्षी अमेरीकेला जायचा योग आला.मुलाने विचारले “बाबा शिनीवारी फिरायला कुठे जायचे?”मी म्हटलं”अरे तुझ्या घरापासुन,न्यू ब्रुन्सवीक किती लांब आहे?”
“ट्रेन ने एका दिवसात जाऊन परत येता येईल.” मुलगा.
“आमच्या कंपनीचं हेड ऑफिस तिथे आहे.ते पहायचं आहे.” मी.
शनिवारची सकाळ.घरून निघायला थोडा उशीर झाला.दोन ट्रेन्स बदलून न्यू ब्रुन्सवीकला पोहोचलो.स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या हेडक्वार्टर्स चा परीसर पाहीला.समोरच चौकात असलेल्या बॅंक ऑफ अमेरीकेच्या इमारतीकडे पहात होतो.दुपारची वेळ.भुक चाळवली होती.चौकात डावीकडे एक रस्ता गेला होता.रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाण्याची हॉटेल्स.पुर्ण रस्ता खानपानाच्या दुकानांचाच होता.तीथे जाताच मुलगा म्हणाला “बाबा ही स्ट्रीट हॉटेल्सचीच दिसते.” तिथे जगभरातल्या विविध देशांमधल्या लोकांनी येऊन हॉटेल्स थाटली आहेत.लेबनीज, इटालीयन,अशी अनेक.
तीथे एक बलूचीस्थानचे हॉटेल दिसले.मुलगा म्हणाला हे हॉटेल बरं वाटतंय.आपल्या देशाच्या जवळचंच आहे.”
हा रस्ता पहाताच मला आठवलं क्लिफर्ड साहेबांनी सांगीतलेली हीच ती स्ट्रीट.
“लॉंग स्ट्रीट,फुल ऑफ इटरीज.”
मी हसलो.
मुलाला म्हटलं “आपण आज इथे सॅंडवीच खायचं”
“बीग बीग सॅंडविचेस….!”
विलास देशमुख
मूंबई
२३/०९/२०२५