*श्रावण मंडळ*

(टिप:-ह्या लेखातील प्रसंगाना काल्पनेची जोड दिली आहे.  ह्याची कृपया नोंद घ्यावी. येथे कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.)

रविवारी रात्री दहाच्या सुमारास मित्राचा फोन आला.

“उद्या सकाळी तयार रहा.ह्या वर्षीचा पहिला श्रावणी सोमवार आहे.आपल्या सोसायटीतल्या श्रावण मंडळाचे सगळे सदस्य शंकराच्या देवळात जाणार आहोत.” 

सोमवारी सकाळी सात वाजता सगळे वरिष्ठ तयार.मिनी बस गेट वरच होती.पुर्वीऑफिसला जाताना काही कारणांमुळे होणारा वेळ इथे नव्हता.सगळेच वरिष्ठ. मंडळाच्या छोट्या ट्रीप साठी वेळेवर हजर.एकही जण उशिराने आला नाही.

हायवे वरचा ट्रॅफिक नवीन नव्हता.एक वळण घेऊन बसने हायवे सोडला.तुरळक वहातुकीतून वाट काढीत शहराच्या बाहेर केंव्हा आलो ते कळलंच नाही.पुढे बरीच खारफुटीची जमीन,चर्च,गावठणं,गावातले चिंचोळे रस्ते पार करीत बस एका समुद्र किनाऱ्यावर बोटीच्या धक्क्याजवळ थांबली.बोरीवली हुन हाकेच्या अंतरावर असलेलं.मालाडहून बोटीने ही जाता येत.मनोरी बेट!

बस मधुन उतरल्यावर लगेच.शंकराच्या मंदिरात.

पहिला श्रावणी सोमवार.आकर्षक दिसणाऱ्या पिंडीवर अभिषेक चालला होता.कार्यकर्त्यांनी व्यवस्था चोख केली होती.सगळ्या मंडळींनी फुले,बेलाची पाने वाहिली.चाफ्याची फुले वाहताना मंद दरवळ पसरला.त्या दरवळाने आणि महादेवाच्या दर्शनाने सगळ्यांना प्रसन्न वाटू लागले.

देऊळ उंचावर होते.एका‌ बाजूला कठडा .कठड्याच्या बाजूला टेकडीचा उतार.उताराच्या पायथ्याशी खेळणाऱ्या लाटा.पुढे पसरलेला अरबी समुद्र.त्याच्या पलिकडे दिसणारी मूंबई. इमारतींच्या रांगांचे क्षितीज. इमारती पलिकडे लपलेले डोंगर.क्षणभर आपण मुंबईत आहोत याचा विसर पडला.

देव दर्शन,अल्हाददायक निसर्ग पाहून पलिकडच्या पायऱ्यांनी खाली उतरायला सुरूवात. उत्साहाला ब्रेक लावला तो पायऱ्यांवरच्या शेवाळाने,म्हणत होते “उत्साह दाखवा,पण जरा जपून.ह्या वयात जो काय उत्साह दाखवायचा तो कठड्याचा आधार घेउनच दाखवा.”

कठड्या सोबत एकमेकांना आधार देत खाली येऊन पाहिलं तर गगनगिरी महाराजांची समाधी.समोर पंगतीला शंभर पानं सहज उठतील एवढा प्रशस्त हॉल.हॉल‌मध्ये भजनाची बारी रंगली.

“आवड तुला‌ बेलाची” हे कोरस सह  भजन‌ झालं.

भजनात रंगलेल्या बुवांनी जेव्हा “जय शंकरा गंगाधरा…” हे विद्याधर गोखले यांच्या मंदार माला नाटकातील पद घेतलं.तेंव्हा वरती शंकराची पिंडी थरथरली.समोरची गगनगिरी महाराजांची समाधी शहारली. बुवांचा आवाज आज काय लागला होता? व्वा!क्या बात! 

बरेच दिवसांनी समोर बसुन नाट्यगीत ऐकायला मिळालं!

“विष प्राशुनी जगतास या

दिधली सुधा करूणा करा!”

आलाप घेऊन बुवा समेवर आले तेव्हा साक्षात पंडीत राम मराठे आठवले.

आयुष्यभर कुटुंबासाठी खस्ता काढताना किती प्रकारचे विष प्राशन करावे‌ लागलं, ह्या विचारात मग्न असलेले सगळे महादेव समोर बसुन शांतपणे ऐकत होते. 

सुख कर्ता दुःख हर्ता,लवथवती विक्राळा,

त्रिगुणात्मक त्रैमुर्ती,दुर्गे दुर्घट भारी,युगे अठ्ठावीस,अशा सगळ्या आरत्या कोरस मध्ये चालू होत्या.ओळख परेड मध्ये आपली ओळख अस्खलित हिंदी मध्ये करून देणाऱ्या काकांकडे सहज पाहिलं.रंगात येऊन आरती मराठीतच बोलत होते.

हे तर काहीच नाही एक आपले भारतीय बांधव. त्यांच्या बस मधल्या गप्पांमध्ये सांगीतलेली फ्लॅट ची किंमत सांगताना गुजरातीत बोलत होते.

“आजनी तारीखमा छ करोड थयी गयी छे!”

पुढे कुठल्या सेलिब्रिटी ने किती फ्लॅट घेतले आहेत?किती भाड्याने दिले आहेत? ह्याची यादीच उघड करून दाखवली.एक बरं बसं मध्ये कुणी रिटायर्ड इनकम टॅक्स वाला नव्हता.

त्याला उत्तर म्हणून आपले मुरकुटे म्हणाले 

“छे,सहा करोड? बोरीवलीत? ह्या पेक्षा साऊथ मुंबई बरी!

हेच भारतीय भाई “येई हो विठ्ठले माझे माऊली ये”ही आरती तल्लीन होऊन चक्क मराठीत ओरडून गात होते.

ते ही वाट पहायचा अभिनया सह!

कोण म्हणतं परप्रांतीयांना मराठी बोलता येत नाही?

प्रसादाची खिचडी आणि चहा झाला.अशा रम्य ठिकाणी फोटो काढायची चढाओढ न लागेल तरच नवल.पुजारी बरोबर चालत होते.”पूढे बावन्न पायऱ्या आहेत” “त्या चढून आपल्याला दत्तगुरूंच्या देवळात जायचे आहे” हे सांगताना सगळ्यांची वयं पाहून पुन्हा एकदा सांगीतलं”कठडा सोडायचा नाही”.

बावन्न पायऱ्या कठड्याच्या सहाय्याने चढताना सगळ्याचे श्वास मोकळे झाले. समोर देवळाचा उंच कळस दिसला आणि न दमताच पावलं पुढे पडू लागली.पंढरपुरातल्या पुंडलीकाच्या देवळा सारखं दिसणारं देऊळ.मराठमोळ्या पध्दतीचं.मुबईत क्वचीतच पहायला मिळतं. मंदीराच्या वरील भागात  चार कोपऱ्यांवर चार श्वानांचे पुतळे बसवलेले आहेत.”हे चार वेदांचे प्रतीक.”पुजाऱ्यांनी माहिती पुरवली.

दत्त दर्शनाला जाण्याचं मनात असुनही वेळे अभावी जाता येत नाही.आज अचानक दत्त दर्शनाचा योग आला आणि आम्हीच तेथे हजर झालो.दर्शन झाले.गजर झाला.हुद्दा विसरून हातात हात गुंफून “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!”गात, नाचत प्रदक्षीणा मारताना सगळे वय विसरले.

उंचावर असलेलं देऊळ,बाजूलाच असलेली आणखी एक समाधी.तिथून दिसणारी हिरवळ.कितीतरी एकरांवर फुलवलेली फळझाडं.त्यात लक्ष वेधून घेत होती ती आज चिकूनी लगडलेली झाडं.

देवळा जवळच डाव्या बाजूला एक चौथरा.त्यावर दाराची चौकट असते तशी चौकट.दिड पुरूष उंच.मधोमध बांधलेली मोठी घंटा.त्या घंटेच्या टोल ला बांधलेला जाडा दोर.प्रथम दर्शनी ती चौकट आणि जाडा दोर पाहून थोडं वेगळं वाटलं.हिंदी सिनेमा मधला प्रसंग आठवला.

“ही घंटा महाराजांनी लावली.” पुजारी.

“पुर्वजांना स्वर्गात सद्गती मिळावी आणि त्यांचे आशिर्वाद मिळावे म्हणून नारायण नागबळी सारखे खर्चीक विधी  केले जातात.गरीबांना न परवडणारा विधी करायचा राहून गेला की वाईट वाटतं.इथल्या महाराजांनी त्यावर उपाय काढला आहे.येथे गरीबातल्या गरीब माणसाला आपल्या पुर्वजांना सद्गती देऊन त्यांचे आशिर्वाद घेता येतात.खर्च फक्त पन्नास रुपये देणगी.”पुजारी उत्साहात सांगत होते.

पुजारी पुर्वजांच नाव विचारतात.गार्हाणं घालतात.

पुर्वजांचे आशिर्वाद मागतात.त्यांना स्वर्गात जाण्याचा रस्ता मोकळा करुन देण्याची विनंती देवाकडे करतात.त्या नंतर आपण हातातला दोर ओढुन घंटेचा नाद करायचा.हा नाद मोकळ्या आकाशात घुमतो.बराचवेळ ध्वनी आसमंतात विहरत रहातो.बाजूचा शांत परिसर,मोकळं आकाश,सभोवतीची बहरलेली फळबाग आणि समुद्रावरचा गार वारा.डोळे बंद करून पुर्वजांची प्रार्थना करणारा काही क्षण ह्या ब्रम्हनादात हरखुन जातो.पुर्वजांना स्वर्गाचे दार उघडून दिल्याचे समाधान चेहऱ्यावर दिसत असतं.

मी बाजूला लगडलेली चिकुची बाग पहाण्यात रमलो होतो.एक एक जण येत होता पुर्वजांच,दिवंगत‌ प्रिय व्यक्तीच्या नावाने ब्रम्हनाद करीत होता.त्याला सदगती मिळावी अशी प्रार्थना करीत होता.ऐंशी पलीकडचे नाना शेवटीआले.त्यांनी एकदा पुर्वजांसाठी ब्रम्हनाद केला.परत न जाता तेथेच थोडे घुटमळले. पुजाऱ्यांना आणखी एकदा गार्हाणे घालायला सांगीतलं.नाव सांगीतले “सुलभा.”पुजाऱ्याने मन लावून गार्हाणं घालताना म्हटलं.”नानांच्या पत्नी सुलभा यांना सद्गती मिळून स्वर्गात जागा मिळू दे.” असे म्हटल्या बरोबर नाना भडकले.पुजाऱ्यावर ओरडून म्हणाले “अहो माझी बायको जिवंत आहे तिथे घरी.माझ्या बायकोचं नाव कमला.तिला कशाला स्वर्गात पाठवताय?”

“सुलू”, माझी कॉलेज मधली मैत्रीण.एक वर्षांपुर्वी गेली.आयुष्यभर नवऱ्याचा त्रास सहन केला.शेवटच्या आजारपणात भेटायला गेलो होतो.सुख म्हणून काय ते मिळून दिलं नाही नवऱ्यानं.” 

पुजाऱ्यांनं नानांच्या मैत्रिणीसाठी गार्हाण घातलं आणि नानांनी दोर ओढला.आसमंतात उमटलेला ध्वनी ऐकत शांत उभे राहीले.पुजाऱ्यानं हलवुन त्यांना जागं केलं.

नाना म्हणाले, “अजून एक नाद करायचा आहे.चांगलं गार्हाणं घाला.”

पुजारी म्हणाला नाव बोला.”वश्या” आप्पांचे स्पष्ट उच्चारात नाव सांगितलं

“नातं?” पुजारी

“अहो हा वश्या,सुलभेचा नवरा ,म्हातारा जीवंत आहे अजून.गार्हाणं असं घाला की तो भरपूर जगला पाहिजे.इतक्यात स्वर्गात गेला तर तो सुलभेला तिथेही त्रास देईल.”

पुजारी हसले आणि वशाच्या दिर्घायुष्यासाठी गार्हाणे घातले.गार्हाणे पुर्ण होताच नानांनी दोर ओढला.ब्रम्हनाद झाला.ह्या वेळी आवाज जरा मोठ्यानेच झाला.मी दचकलो.पाठी वळून पहातो तर नानांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं.

नानांच्या लव्ह स्टोरीची थीम एखाद्या सिनेमावाल्या कडे पोहोचवण्याचा विचार आहे.मराठी सिनेमाला चांगले दिवस येण्यासाठी तेवढीच मदत!

पुजाऱ्यांना  देणगी देताना नावाच्या स्पेलींग मध्ये चुक दिसली.वडिलांबरोबर आलेला सुमीतने ती दाखवुन दिली.चुक दाखवुन दिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.नुकताच शाळेत स्पेलींग शिकलेल्या लहान मुलांच्या दिसतो तसा.म्हातारे वडील बरोबर होते.त्यांनी शाबासकी दिल्यावर आणखीनच खुश झाला.सगळ्यांनी केलेल्या चौकशीला तो लहान मुलांप्रमाणे उत्तरं देत होता.आज्ञाधारक मुला प्रमाणे वडीलांच्या बरोबर चालत होता.हसरा चेहरा,नीट केलेली दाढी.पाच,साडेपाच फूट उंची,स्वच्छ इस्त्रीचे कपडे.फक्त त्याची उत्तरे लहान मुला सारखी होती!

सगळ्या वरिष्ठांच्या बरोबर आलेला सुमीत आज 

श्रावण बाळ वाटला!

हायवेला बस आली तेंव्हा शेजारी बसलेल्या नानांचा फोन वाजला. शांत बसलेल्या नानांनी फोन घेतला.ओरडुनच म्हणाले 

“काय गं तुझी कटकट?” 

“हो.बस हायवेला आहे.थोड्याच वेळात घरी पोहोचतोय.”

फोन नानांच्या सौभाग्यवतीचा होता.

औषधाच्या गोळ्यांच्या वेळेची आठवण करून देणारा!

 

विलास देशमुख 

बोरिवली, मुंबई 

०४/०८/२०२५