*अवघी दुमदुमली डिस्कव्हरी*

आषाढी म्हणजे,दिंडी, तुळशीच्या माळा,मांडलेला खेळ, माऊली,गळाभेट,उपवास ,साबूदाणा खिचडीचा सात्विक आहार.वारीची शिस्तबध्द आखणी. 

हे वर्णन आषाढी वारीच आहे.लाखो लोक पायी चालत पंढरपूर ला जातात.आरडा ओरडा नाही.शिस्त,आनंद वाटणे हे आपल्या वारीतुनच महाराष्ट्रातल्या संतांनी रूजवलं.पंढरीची वारी हे त्यांचे एक उदाहरण आहे.

वर्षानुवर्षे चालत आलेली महाराष्ट्रची परंपरा.ही परंपरा आज आपल्या सोसायटीत पहायला मिळाली.

“ज्ञानोबा माऊलीऽ तुकाराम” म्हणत सदरा‌,लेंगा,टोपी,हातात

टाळ वाजवीत सगळे शहरी जेंटलमन लोकं आज माऊली,माऊली म्हणत एकमेकांची गळाभेट घेत होते.मराठमोळी पालखी संपदा खांद्यावर घेऊन मिरवीत होते.

बाल संतांचा मेळा पालखीपुढे चालताना पहाणे म्हणजे आपल्या संकुलाला संतांचे पाय लागल्याचे भाग्यच.

सोबतीला परब्रम्ह आणि रखुमाई म्हणजे सोन्याहून पिवळं.

पालखी निघाली असताना आलेली पावसाची सर म्हणजे सहनिवासातील लोकांच्या भावनेला  देवाने दिलेला आशिर्वादच.

पंढरीच्या देवळाच्या मंडपात भजनी बुवांनी गायलेले “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ऽ ऐकण्याचा योग बऱ्याच वर्षांपुर्वी आला होता.धिर गंभीर मृदुंगाचा घुमणारा आवाज,टाळ ,चिपळ्यांची साथ आणि सोबतीला तुकोबांचे अभंग.आज संकुलातल्या क्लब हाऊस मध्ये पाय ठेवताच त्याची आठवण झाली !

डीजेचं उर फुटेपर्यंत घुमणं‌ नाही.तरीही सण साजरा करता येतो का ?

तर होय  येतो!

हे आज पहायला मिळालं.

रोजच्या धावपळीतुन वेळ काढून उत्सव समितीचे पायीक,पायरी पायरीने आखणी करीत होते.त्यांच्या प्रयत्नाला दाद दिलीच पाहिजे.त्यांच्या साथीला होता वरिष्ठ नागरिकांचा गृप.ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून साकार झाला भक्तिगीतांचा कार्यक्रम.घाई घाईत मांडलेला खेळ एवढा चांगला होऊ शकतो म्हणजे,कार्यक्रमात भाग घेणारा प्रत्येकजण आधीच एक,कसलेला कलाकार असल्याची पावतीच आहे.त्या शिवाय का एवढ्या कमी वेळात असा बहारदार,श्रोत्यांना माना डोलायला लावणारा सोहळा पहाता आला?

एका पाढोपाढ एक  अभंग, भावगीतं,नाट्यगीते ऐकायला मिळाली.प्रत्येक श्रोत्याला शब्द न शब्द पाठ होता.गायकांच्या बरोबर त्यांचे हलणारे ओठ ही त्याची साक्ष.

आपला दर्जा,हुद्दा,शिक्षण,कामगीरी विसरून मंडळी बसली होती.काही इंग्लिश मिडीयम मध्ये शिकलेल्या कलाकारांनी अस्खलीत मराठी शब्दोच्चारात अभंग म्हटले.”क्रोध ,अभिमान गेला पावटणी….” अशीच परिस्थिती होती.

गायक,वादक,निवेदक अतिशय आत्मियतेने कार्यक्रम चांगला करण्याचा प्रयत्न करीत होते.त्यांच्या प्रयत्नाला यश आलं,हे प्रत्येक गाण्या नंतर मिळणाऱ्या टाळ्या सांगत होत्या .श्रोत्यानी धरलेला‌ ठेका ,त्यावर हलवलेल्या माना म्हणजे ह्या हृदयी चे त्या हृदयी पोहोचल्याची पोच पावतीच होती.सर्वात महत्वाचे म्हणजे, गायक वादकांच्या घरच्या मंडळींच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते.चेहरा सांगत होता,”आपल्या घरात एवढा मोठा कलाकार आहे हे एवढी वर्ष आपल्याला कसे माहित नव्हते?”

लहानपणी रेडीओवर ऐकलेली भक्ती गीतं.मोजक्याच वाद्यवृंदासह एवढ्या जवळून ऐकायला मिळण्यातला आनंद,थेटर मधले हजार रुपयांचे तिकीट काढूनही मिळणार नाही. 

देव माझा विठू सावळा

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई

फिरत्या चाका वरती 

कानडा राजा पंढरीचा 

राधाधर मधु मिलींद जय जय

आली कुठून शी कानी

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला

अभिर गुलाल उधळीत रंग

रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली

विठू माउली तू माउली जगाची 

एक तारी संगे एकरुप झालो

आणि शेवटची भैरवी,

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर

व्वा!क्या बात..!

अशी एका पेक्षा एक सुश्राव्य गाणी ऐकायला मिळणं नक्कीच आपलं भाग्य आहे.

ह्या मराठी भक्ती गीतां मध्ये साखरे सारखं मिसळलं ते, हिंदी शाम भजन “मै तो दर्शन करने आयो शाम.” 

निवेदन तर समर्पक होतच पण,गाणी ऐकता ऐकता  केलेलं निरूपण,स्वरचित कवितांच्या,अभंगाच्या वाचनाने कार्यक्रमात लज्जत आणली .

गेली कित्येक वर्ष सोसायटीच्या सभेतले वाद विवाद,भाषणं,आरडा ओरड तसेच भिंती पलिकडच्या व्यायामाच्या वजनानांच्या खणखणाटाने  उठलेलं डोकं आज गाण्यांच्या लकेरी आणि ताना ऐकुन शांत झालं होतं, याचा प्रत्यय कार्यक्रम संपल्यावर आला.क्लबच्या रिसेप्शन मधुन बाहेर पडताना डाविकडे लक्ष गेलं. भिंतीवरून लता दिदींच्या चेहऱ्यावरचं स्मित आज जरा जास्तच खुललं होतं.

म्हणत होत्या,

“आनंदाचे डोही आनंद तरंग…..”

विलास देशमुख 

२/७०१,डिस्कव्हरी

६/०७/२०२५