दिवाळीची धामधुम संपली होती.बरेच दिवस नाट्यगृहाकडे फिरकलो‌ नव्हतो. दिवाळी नंतर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात फेरी झाली ती दिवाळी अंकासाठी.”ऋतुरंग” दिवाळी अंक वाचून झाला‌ होता.गुलजार यांच्या कविता,त्यांची माहिती प्रामुख्याने वाचायला मिळाली.अंक बदलला आणि सहज नाट्यगृहच्या तिकीट विंडो वर डोकावुन पाहिले तर मागच्या फळ्यावर नाटकांच्या यादीत गाण्याच्या कार्यक्रमाचे नाव दिसले.अंकात‌ वाचलेल्या गुलजारच्या अर्थपुर्ण कविता डोळ्यासमोरुन गेल्या.कार्यक्रम मराठी गाण्यांचा होता.गुलजार सारख्याच आशयघन मराठी कविता लाहीणऱ्या कवियीत्री शांता शेळकेंच्या गाण्याचा.”चैत्रयामिनी”.

गुलजार, साहिर लुधियानवी,असे साध्या शब्दांतून मनाचा ठाव घेणाऱ्या गितकारांनी हिंदी चित्रपट सृष्टी समृध्द केली.मराठीत गदिमा,जगदिश खेबुडकर ही नावं त्या बाबतीत गाजली. शांता शेळके हे त्याचं पठडीतलं नांव.काही दिवसांपुर्वी त्याचं गाणं युट्यूबवर ऐकलं होतं. “अजब सोहळा”. त्यातली शेवटची ओळ लक्षात राहीली होती. “माणसा रे आता,बघ उघडुन डोळा, माती भिडली आभाळा” त्यांच्याच गण्यांचा कार्यक्रम होता.

दोन तिकीटे काढली आणि शुक्रवार दि.२९/११/१४ ८.३०ला बालकनीतल्या खुर्चीवर जाऊन बसलो.मराठी चित्रपट सृष्टीतली काही अजरामर गाणी आज ऐकायला मिळणार होती.समोरचा तो रेशमी पडदा संथपणे हालत होता. कार्यक्रमाला तसा वेळ होता.पडद्यामागून वाद्यांचा आवाज येत होता.आज कुठली गाणी ऐकायला मिळतील याची उत्कंठा.

तेवढ्यात शाळेत मराठीच्या पुस्तकतील शांताबाईंची कविता आठवली. “सहज मिळे त्यात जिव तृप्तता न पावे जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे “ नंतरच्या आयुष्यात ह्याचा प्रत्यय आला होता.

पुढे रेडीओवर ऐकलेली गाणी आठवली

अपर्णा तप करीते काननी

एक एक‌ विरते तारा,आसमंत‌ ये आकारा

का धरतीला परदेस? सजणा…

शुर आम्ही सरदार आम्हाला ….

ही सगळी गाणी ऐकायला आजही आवडतात. त्यातलीच काही गाणी ह्या कार्यक्रमात सादर झाली.गायक कलाकारांनी प्रेक्षकांना चांदण्यात नाहून काढलं.

सुरुवातीला गजानना श्री गणराया ह्या गाण्याने भक्तीमय वातावरण तयार केले.”असेन‌ मी नसेन‌ मी…“ह्या गाण्यात शांता बाईंच मनोगत त्यांनी मांडलं आहे.”मी डोलकर” हे कोळी गीत,”ही वाट दुर जाते” हे स्वप्न गीत,”किलबील किलबील पक्षी बोलती” हे बाल गीत,हे बंध रेशमाचे नाटकातील नाट्य गीत “काटा रुते कुणाला” ते”रेशमाच्या धाग्यांनी” ही लावणी ऐकता ऐकता वेळ कसा गेला हे कळलंच नाही.

टीव्ही आणि म्युझीक सिस्टीम वर गाणी ऐकायला छान वाटतात,पण समोर बसुन प्रत्यक्ष कलाकारांच्या तोंडुन गाणी ऐकण्याची मजा काही औरच.ती वादकांनी जीव तोडून दिलेली साथ.गाण्यात मध्येच गायकांनी वादकांना दिलेली जागा.त्या जागेचं वादकांनी केलेलं सोनं,ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरते.सगळा समोरा समोरचा मामला.आवडत्या भावगीतांना अर्थपुर्ण माना डोलावल्या जातात.गाण्यातले शब्दार्थ जुन्या अठवणींपाशी नेऊन सोडतात.काळोखात खुर्ची खाली पायाने ठेका धरला जातो.गाणे संपु नये असं वाटतं.त्यामुळेच प्रेक्षकांमधुन वन्स मोअर ची मागणी होते.अशावेळी निवेदकाला प्रेक्षकांचे मन मोडवत नाही.एखादा अंतरा पुन्हा गायला जातो आणि प्रेक्षागृह टाळ्यांच्या कडकडाटात आपला आनंद व्यक्त करतं.

ह्या कार्यक्रमात लक्षात राहीलं ते ढोलकी वादन आणि त्या नंतर सुरू झालेली लावणी.लावणी ऐकताच शेजारी बसलेल्या आजोबानी कवळीची पर्वा न करता वाजवलेली शिट्टी.आजींनी कौतुकाने त्यांच्याकडे पाहाणं आणि लाजणं.तसंच मखमली कुर्त्यातले पुरूष,उबदार शाल आणि गजरा घातलेल्या बायकां,तसेच तरूणाईची उपस्थीती मराठी भाषेच्या आपलेपणा बद्दल बरंच काही सांगुन गेली.मराठीपण टिकवून ठेवण्या साठी असे गाण्याचे कार्यक्रम नक्कीच मदत करतील.

चंद्र,चांदणे,चांदण्या गाण्यांतून प्रेक्षकांच्या अंगावर बरसत होत्या.सागर लाटांवर प्रेक्षक तरंगत होते.

मिहीर परंतू होता भवती आज मंदिरी,दिप तेवले तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे…

ह्या गाण्याला पसंतीचे वन्स मोअर आलेच.

गाण्याच्या कार्यक्रमात थिएटर हाऊसफुल्ल? ह्याचा अर्थ आशयघन गाणी प्रेक्षकांच्या लक्षात रहातात.ती‌ पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात.अशावेळी आयोजकांना आणि प्रायोजकांना आपल्या मराठी भाषेसाठी केलेल्या प्रयत्नांचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते.आजही नवसंगीताच्या सोबतीने जुनी गाणी प्रेक्षकांच्या मनात रूंजी घालतात.अशा गाण्यांचा आनंद‌ ह्या कार्यक्रमातून घेता येतो.त्यातही प्रेक्षकांशी संवाद साधणारे, हवेहवेसे वाटणारे निवेदन असले म्हणजे प्रेक्षक आनंदाच्या बरोबर तणाव मुक्तीचा अनुभव घेताना दिसतात.

कार्यक्रम संपल्यावर आम्हाला रिक्षावाल्याने इमारतीच्या प्रवेशक्षद्वाराजवळ सोडलं तेंव्हा बारा वाजून गेले होते.इमारती पर्यंत चालत निघालो.संकुलात शांतता पसरली होती.कठड्यामागची फुलझाडं वाऱ्यावर डोलत होती.पलिकडच्या टॉवर मुळे आकाशात चंद्र दिसत नव्हता पण डोक्यात गाण्याच्या ओळी गुंजत होत्या.

“निरवता ती तशीच,धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले,चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच,तीच गंध मोहिनी …………तोच चंद्रमा नभात,तिचं चैत्र यामिनी एकांती मज समीप…..

हीच आहे शांता बाईंच्या शब्दांची जादू!

विलास देशमुख

मुंबई

०४/११/२४