गुरूकुल
“बाबा तुला आठवतय का? मला तू एक निबंध लिहून दिला होतास.सगळ्यांना आवडला होता. ट्युशनमध्ये टिचरने मुद्दाम वाचून दाखवायला सांगीतला होता” शनिवारी संध्याकाळच्या फोनवर मुलाने विचारलेला प्रश्न. मी पुर्ण विसरलो होतो. पण मुलाला एवढ्या वर्षांनीही ते आठवत होते.”अरे हो पण त्याचं आता काय?”मी. “काही नाही,मी येथे महाराष्ट्र मंडळाचा मेंबर झालो आहे.त्यांच कालच इमेल आलं आहे.त्यांना त्यांच्या दिवाळी अंकासाठी लेख पाहिजेत.” मुलगा.
ट्युशन क्लास मध्ये मराठी निबंधाला मिळालेलं प्रोत्साहन एवढ्या वर्षांनी आठवेल असं मला तरी वाटलं नव्हतं.ते ही इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेल्या मुलाकडून! लहानपणी घडलेले चांगले संस्कार भविष्यात असे उपयोगी पडतात हे मात्र खरं.
आमचा धाकटा मुलगा पाचवीत/सहावीत होता.दोघेही नोकरी करीत असल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणं जमत नव्हतं.आम्ही शिकवणी साठी क्लास शोधत होतो.नावाजलेले शिकवणीचे क्लासेस समोर दिसत होते,त्यांची ती वातानुकुलीत ऑफिसं.आमचा क्लास,कसा मुलांचे मार्क वाढवण्यात मदत करतो,क्लासमधली कुठल्या मुलांना किती टक्के मार्क मिळाले हे सांगणारी रिसेप्शनीस्ट आणि तिने हळूच पुढे केलेली भरमसाठ फीयांची यादी.तसेच लवकरात लवकर ॲडमिशन घ्या नाहीतर सीट्स फुल होतील.अशी धमकी वजा सुचना.हे सगळं ऐकून आम्हाला त्या वेळी एसी मध्ये घाम फुटला होता.
“आपल्या सोसयटीमध्येच ट्युशन सुरू होत आहे.माझे सगळे मित्र जाणार आहेत,मी पण जाऊ?” एक दिवस मुलगा सांगत आला.एकाच वयोगटातली मुलं खेळता खेळता ह्या ट्युशन मध्ये सामील झाली.समोरची शाळा चांगलीच होती.ट्युशनचाही प्रश्न मुलाने सोडवला होता.आमच्या डोक्यावरचा भार हलका झाला होता.
पहिल्या वर्षी ट्युशन मधली सगळी मुलं चांगल्या मार्कांनी पास झाली.सगळ्या पालकांना बरं वाटलं.दुसऱ्या वर्षीही मुलांना चांगले मार्क्स पडले.घरी येऊन मुलं कमी पडलेले मार्क्स कुठे गेले हे शोधू लागली.आम्हाला अंदाज आला,शाळेतल्या शिक्षकां पेक्षा ट्युशन मध्ये आपण कुठे कमी पडलो ही पहायची सवय लावली होती.पुढच्यावेळी मुलांमध्ये मार्क्स कमी मिळू नये याची स्पर्धा लागलेली दिसली,आणि ह्या मुलांचा एक गृप तयार झाला.त्यांना एक मेंटर मिळाला होता.बाहेरच्या शुक्राचार्य, वसिष्ठांपेक्षा,मुलांना संकुलातच सांदिपनी मिळाला होता.बघता बघता टिचरचं घर म्हणजे गुरुकुल झालं होतं!
ह्या गुरूकुलात शाळेचा सिलॅबस होता.अभ्यास होता. सगळे विषय होते. खुला वादविवाद होता.कुठल्याही विषयावर मुक्तपणे विचार मांडण्याची मुभा होती.एखादी गोष्ट पटली नाही तर खुली चर्चा होती.ह्या मुळे एखाद्या विषयाची खोलात जाऊन माहिती मिळवण्याची सवय मुलांना लागली.गोष्ट पटली नाही तर त्यावर निर्भिड पणे प्रश्न विचारण्याचा आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण झाला.हे असे का? असे का नाही? मुलांच्या ह्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली.मुलांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याची प्रक्रिया केंव्हा सुरू झाली हे त्यांनाही कळलं नाही.
शाळेतले टेस्टचे मुलांनी लिहीलेले पेपर पालकांना पहायला पाठवतात.इथे पालक पण त्याच,शिक्षक पण त्याच.शाळेतुन मिळालेल्या मुलांच्या उत्तरपत्रिका पालकांकडे पोहोचायच्या आधी इथेच पाहिल्या जात.कमी मिळालेल्या मार्कांचा पंचनामा होत असे.शाळेतल्या शिक्षकांनी चुकून,बरोबर उत्तराला कमी मार्क दिले तर स्वतःशाळेत जाऊन मार्कं वाढवून आणण्याचे जिकीरीचे काम त्या करीत.त्यामुळे मुलं आई बाबांपेक्षा टीचरला महत्व द्यायला लागली.
इतर क्लासेस मध्ये पालकांना भेटायला जावं लागतं. पाल्याची प्रगती कशी चालली आहे हे नाटकीपणे सांगीतलेलं ऐकावं लागतं.त्यातच पुढल्या वर्षीसाठी आमचा क्लास कसा चांगला हे सुचवलं जातं.ह्या गुरूकुलात पालकांची भेट संकुलातच येता जाता व्हायची.हसत हसत सांगीतलं जायचं.”तुमचे महाशय अभ्यासात चांगले आहेतच,आता आपली मते ठामपणे मांडण्यात पटाईत झाले आहेत.” ऐकुन आई खुश.घरी अभ्यासासाठी मागे लागण्याच्या टेन्शन मधुन मुक्त होण्याचं सुख म्हणजे काय ते आईच्या चेहऱ्यावर साठवलं जायचं.
येथे नुसता अभ्यास नव्हता.मुलांना संस्कृतीची ओळख येथे झाली.स्वदेशा बद्दल अभिमान येथेच शिकवला गेला.आजी आजोबांची काळजी मुलं घेऊ लागली.एकदिवस मुलगा एका आजीला रस्ता ओलांडून देत असताना आम्ही खिडकीतून पाहिलं. हे कसं काय? “अरे बाबा हे सगळं टीचर सांगते.ती आजी चाचपडत होती,तीला रस्ता ओलांडून दिला.हसली आणि तिने बेस्ट विशेश दिल्या.”मुलगा.
निसर्गातली भटकंती,ट्रेकींग,सायन्स सेंटर ची सफर,ह्या पालकांना अवघड वाटणाऱ्या गोष्टी सहज घडवून आणल्या त्या ह्या गुरूकुलाने.वाढदिवस साजरे व्हायचे.कुठला ही मोठेपणा न मिरवता मित्रांच्या वाढदिवसात सगळे गुरूकुल सहभागी होत असे. इथे सगळे सणही साजरे व्हायचे.गुरू पौर्णिमा हा महत्वाचा सण.घरातच गायन कलेचे उपासक.दर वर्षी गुरूपौर्णिमेच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ठरलेला.नकळत मुलांना संगीतात रस घ्यायची संधी मिळाली.पुढे जाऊन एखादा गायक होईल,की नाही ते सांगता येणार नाही.पण इंग्रजी शाळांतून शिकलेल्या कोवळ्या मुलांच्या डोक्यात भारतीय शास्त्रीय संगीत म्हणून काहितरी असते,हे नक्की बसलेले असणार.भविष्यात ह्याचा नक्की उपयोग होईल.
दिवाळीची सुट्टी होती शाळेला.गुरूकुलात मात्र काहींना काही सुरू असायचे.कंदिल,किल्ले,रांगोळी ह्या गोष्टींमध्ये मुलं रमुन जायची.एक दिवशी संध्याकाळी आई नुकतीच ऑफिसमधून घरी आली होती.मुलगा आईला म्हणाला “आज मला कपाटतले नवीन कपडे काढून दे,माझं लग्न आहे.” हे ऐकून ही तीन ताड उडाली.सातवीतला मुलगा लग्नाचं बोलतोय! आईनी मस्करीने म्हटलं”कुणाशी रे?” “आज रात्री तुळशीचं लग्न लावणार आहेत.मी त्यात नवरा होणार आहे.टिचरच्या घरी.”आई स्वतःशीच हसली आणि कपाटाकडे पळाली.
हे अस्सच गुरूकुलातलं शिक्षण दहावी पर्यंत चालू होतं.दहावीच्या वर्षी पालकांपेक्षा टिचरलाच जास्त चिंता.गणीत,संस्कृत सारखे विषय शिकवण्यासाठी बाहेरून उत्तमातले उत्तम शिक्षक बोलावून घेतले होते. सारख्या टेस्ट्स होत होत्या.पेपर तपासायला बाहेर तज्ज्ञांकडे पाठवले जात होते.तपासुन आलेल्या पेपरमधल्या चुका,त्रुटी दुरुस्त केल्या जायच्या.ह्या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.
दहावीला सगळी मुलं नव्वदीच्या आसपास टक्के घेऊन पास झाली.ठरवल्या प्रमाणे मुलाला आम्ही कॉमर्सला घालायला निघालो.सायंन्स तसे कठीणच असते.बीएस्सी पेक्षा बीकॉम सरळ सुटसुटीत. पदवीधर होण्यासाठी कॉमर्स बरे,असा आमचा समज. आमचे महाशय मात्र सायन्सला जाण्याच्या निर्णयावर ठाम होते.भरपुर समजावून पाहिलं.शेवटी टिचरला जाऊन भेटलो.म्हणाल्या “त्याला अडवू नका!” गुरुकुलातूनच सपोर्ट मिळाला.मार्कं चांगले होतेच.चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.तो ही सायंन्सला.विषेश म्हणजे कॉम्प्युटर सायंन्सला!
सगळ्याच मुलांना चांगले मार्क्स होते.आपआपल्या आवडत्या विषयांच्या कॉलेजात प्रवेश घेऊन मुलं मोकळी झाली.पायाच एवढा मजबूत करून घेतला होता की पुढे उच्च शिक्षण कठीण जाण्याचा प्रश्नच नव्हता.
आज एवढ्या वर्षांनी मागे वळून पहाताना दिसतात ते बाल मनावर केलेले संस्कार,उत्तमाकडून अतिउत्तमाकडे जाण्यासाठी तयार केलेली त्यांची मानसिकता.एखादा सुदामा सोडला तर सगळे कृष्ण आपापल्या क्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर आहेत. ह्या कृष्णांना मार्गदर्शन करणाऱ्या टिचर इथे सांदिपनींच्या भुमिकेत होत्या!
हल्ली रंगीत कपडे घालून बसची वाट पहात उभे असलेल्या मुलांच्या झुंडी दिसतात.वहातूक कोंडी करणाऱ्या पिवळ्या बस दिसतात.मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी खर्चाचा भार उचलणारे पालक असतात.तेवढेच आधुनिक शिक्षण शिकवणारे शिक्षकही असतात,पण पुलंच्या चितळे मास्तरांची आठवण करून देणारे गुरू अभावानेच आढळतात.तिच आपुलकी,तिच शिस्त,तेच शिकवणे,तिच तळमळ आणि तसेच नकळत अभ्यासाचं मर्म मुलांच्या मनात उतरवणं.हे सगळं मुलांना मिळालं आमच्या संकुलात.
सौ.गुरवांच्या गुरूकुलात!
विलास देशमुख
मुंबई
०४/१०/२०२४