पाहुणी
निवडणुकीसाठी राजकारण्यांची उमेदवारांची जमवाजमव,पित्रूपक्ष,परतीच्या पावसाचा धुमाकूळ ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना.सगळीकडे वातावरण कुंद होतं.नाही म्हणायला सचीन,चितळेंचा ब्रॅण्ड ॲंबेसेडर झाला,स्वर्गिय लता दिदींच्या वाढ दिवसाच्या दिवशी एफ एम वर ऐकलेली त्यांची गाणी, तसेच आमच्या इमारतीच्या लिफ्टच्या भिंतीवर पु ना गाडगीळ ज्वेलर्सनी लावलेली आकर्षक जाहिरात. ह्याच काही गोष्टी मनाला उभारी देऊन गेल्या.
संकुलात वार्षिक सभेची तयारी सुरू होती.सभेत सर्वात महत्वाचा विषय होता लिफ्टचा.लवकरात लवकर लिफ्ट दुरुस्ती करणे.तरूण मंडळींनी दुरुस्ती पेक्षा नवीन लिफ्ट बसवण्यासाठी आग्रह धरला होता.खर्चिक विषय होता.वरिष्ठ नागरीकांनी मात्र मागणी लावून धरली होती,की हीच लिफ्ट दुरूस्त करण्याची.”कशाला उगाचच कमीटीला खर्चात टाकायचे? महागाई किती वाढलीय?” एक ऐंशी पलीकडचे आजोबा.हेच आजोबा पुर्वी वार्षिक सभा हलवुन सोडायचे.कमिटीला विरोध करण्यात सर्वात पुढे असायचे. “दुरुस्ती करताना लिफ्टच्या इंटेरीयरला धक्का लावू नये.” ही मागणी प्रामुख्याने दिसत होती.ह्या मिटींग मध्ये आजोबां लोकांचे प्रमाण जरा जास्तच दिसत होतं.ठरवुनच आल्याचे दिसत होतं.घरच्यांनी मिटींगची आठवण न करून देता आठवणीनी सगळे हजर होते.
मागील काही दिवसांपासून आजोबांच्या लिफ्टच्या फेऱ्या वाढल्या होत्या.घरी आजींनी न सांगता मॉर्निंग वॉक नियमित झाला होता.लगेच दुध आणण्या साठी आजोबा तयार.परत एक फेरी वाण्याकडे.अकरा वाजता भाजी,दुपारी फळे आणायला आजोबा एका पायावर तयार असायचे.आजींना पडलेला प्रश्न “ह्यांचे पाय,कंबर दुखायचे थांबले कसे?” नवीन औषधाचा परिणाम असावा!
संध्याकाळी गप्पांचा फड.हल्ली सगळेच आजोबा आनंदी दिसायचे.भाज्यांच्या भाव वाढीची तक्रार नाही,एफडीचे रेट कमी जास्त झाल्याची खंत नाही.शारीरीक तक्रार नाही की मुलांच्या कटकटी नाहीत.उलट अंगावरचे नेहमीचे जुने कपडे जाऊन,इस्त्री केलेला ठेवणीतला शर्ट पॅन्ट आला होता.थोडक्यात काय त्यांच्या लिफ्टच्या फेऱ्या वाढल्या होत्या आणि चेहऱ्यावर सकारात्मक भाव उमटले होते.थोड्या फार फरकाने सगळ्याच वरिष्ठांमध्ये हा फरक दिसू लागला होता.
लिफ्ट बिघडू नये म्हणून जे करता येईल ते करण्याची तयारी ह्या एव्हर ग्रीन ब्रिगेडने केली होती. उदा.लिफ्टमध्ये जास्त वजन नेण्यांवर बंदी.लिफ्टला वजनाचा त्रास होऊ नये हे एक कारण.दरवाजा जोरात लावण्यावर बंदी.दरवाज्याच्या आवाजाने कानांना त्रास होतो हे समजावुन सांगीतलं जायचं.त्यातुनही लिफ्ट बिघडली की लगेच व्हॉट्सअँप वर मेसेज,सेक्रेटरीला फोन,एवढंच नाही तर लिफ्ट रीपेरवाल्याला फोन करून बोलावून घेणे,स्वत:उभं राहून लिफ्ट दुरुस्त करून घेणे.एवढी आपुलकी लिफ्ट बद्दल आणि सोसायटी बद्दल निर्माण झाली होती.शेजारच्या काकू बोलल्या देखील. “पिंट्याचे आजोबा लिफ्टची किऽतीऽ काळजी घेतात?”
पित्रू पक्ष सुरू झाला होता.तिथी प्रमाणे पुर्वजांना जेऊ घालण्याचा प्रघात.पुर्वी आजोबा गंभीर चेहऱ्याने ताट हातात घेऊन लिफ्टने गच्चीत जायचे.ह्या वर्षी मात्र आजोबांनी उत्साहाने लिफ्टच्या दोन फेऱ्या केल्या.एक पुरुष पुर्वजांसाठी आणि एक स्री पुर्वजां साठी.अजुनही सासर माहेर अशा दोन्हीकडच्या पुर्वजांना जेवण घेऊन लिफ्ट ने गच्चीत जायच्या तयारीत होते.घरच्यानी अडवले तेव्हा थोडे खट्टू झाले.
पित्रूपक्षात सोन्याचा भाव कमी असतो.पण ह्या वर्षी सगळ्यांचे अंदाज चुकले.तोळ्याला ७५हजारावरून ७७हजारावर भाव गेला.जगात सुरू असलेल्या लढाईमुळे तिथले आकाश धुराने काळवंडले आहे आणि सोन्याला मात्र उच्चांकी झळाळी आली आहे. पित्रूपक्षात ही स्थिती तर दसऱ्याला काय भाव असेल? संध्याकाळच्या कट्ट्यावर चर्चा रंगली.
विषय महागाई वरून पुन्हा लिफ्टवर आला.”सोन्याचा भाव वाढत आहे म्हणजे महागाई वाढते.त्यामुळे लिफ्ट नवीन न घेता,आहे तीच दुरुस्त करून चालवता येईल.” त्या आजोबांनी कट्ट्यावर आपला प्रस्ताव पुन्हा मांडला.आपल्या प्रस्तावाला बहुमताने पाठिंबा आहे ना ह्याचा अंदाज ते घेऊ लागले.
जेवणाची वेळ झाली होती.अंधार,त्यात पाऊस सूरू झाला.घरी येऊन जेवायला बसलो.
ही उत्साहाने सांगू लागली.”आज माधुरी विमानाने परदेशात जात होती.विमानात सिटचा काहीतरी घोळ झाला होता.वीआयपींची बडदास्त ठेवण्यासाठी स्टाफची धावपळ सुरू होती.”एक सहकारी हीला म्हणाली “मॅडम,माधुरीला पहायचं असेल तर चला व्हीआयपी लाउंज मध्ये बसली आहे.”
कॉम्पुटर समोरून डोकं वर काढून ही,तीला म्हणाली “माधुरी! अग तीला मी रोज बघते.एक महिना झाला,आमच्या बिल्डींगच्या लिफ्ट मध्ये तिला आणुन बसवलय. पी एन गाडगीळ ज्वेलर्सनी.” “गळ्यातला हार काय मस्त आहे!”
विलास देशमुख
मुंबई
१/१०/२०२४